'रहिवाशांनो, संक्रमण शिबिरात स्थलांतरित व्हा...' इमारतीमधील रहिवाशांना म्हाडाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:16 AM2024-07-16T11:16:15+5:302024-07-16T11:19:29+5:30
ऐन पावसाळ्यात मुंबईतल्या धोकादायक इमारती कोसळून रहिवाशांचा नाहक बळी जाऊ नये म्हणून म्हाडा प्राधिकरणाने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : ऐन पावसाळ्यात मुंबईतल्या धोकादायक इमारती कोसळून रहिवाशांचा नाहक बळी जाऊ नये म्हणून म्हाडा प्राधिकरणाने वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, जोगेश्वरी पूर्वेकडील पीएमजीपी वसाहतीमधील १७ इमारतींपैकी ३ ते ४ धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या इमारतींमधील रहिवाशांना नोटीस देण्यासह त्यांना संक्रमण शिबिर उपलब्ध करून दिले आहे. भविष्याचा विचार करता रहिवाशांनी संक्रमण शिबिरात स्थलांतरित व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या दहा वर्षांपासून जोगेश्वरी येथील पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आहे. येथील पुनर्विकासासाठी सोसायटीकडून नेमण्यात आलेल्या विकासकाकडून पुनर्विकासास विलंब होत आहे. त्यामुळे इमारती आणखी जर्जर होत असून, त्या पडण्याच्या स्थितीत आहे. १७ पैकी ३ ते ४ इमारती खूपच धोकादायक स्थितीमध्ये आहेत. त्यामुळे म्हाडाने आता येथील रहिवाशांना नोटीस देत घरे रिकामी करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय रहिवाशांना संक्रमण शिबिरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दरम्यान, खबरदारीची उपाययोजना ज्या इमारतींचे प्लास्टर खूपच खराब झाले आहे; तेथे नव्याने प्लास्टर करून दिले जात आहे. शिवाय जिथे बांधकाम पडण्याचा धोका अधिक आहे; तिथे टेकू दिला जात आहे. एकंदर रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही, यासाठी ‘म्हाडा’कडून काम सुरू आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट केले-
१) १९९०-९२ साली जोगेश्वरी येथील पीएमजीपी वसाहत बांधण्यात आली.
२) एकूण १७ इमारती आहेत.
३) ९४२ निवासी घरे तर ४२ दुकाने आहेत.
४) श्रीपती रिअल व्हेंचर्स एल. एल. पी. या विकासकाची नियुक्ती संस्थेने केली होती. मात्र, १० वर्षांत विकासकाने विकास केला नाही.
५) शासन पत्रानुसार विकासकाची नेमणूक रद्द करण्यात आली आहे.
६) इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. इमारती धोकादायक असून, राहण्यासाठी योग्य नाहीत.
७) म्हाडाने इमारतीच्या धोकादायक भागास टेकू लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
८) वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाकरिता विकासकाची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.