Join us  

वांद्रे येथील ‘साहित्य सहवास’मध्ये दूषित पाणी; रहिवासी आजारी, पालिकेकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:03 AM

पावसाळा सुरू होताच शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.

मुंबई : पावसाळा सुरू होताच शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. वांद्रे येथील साहित्य सहवास आणि पत्रकार कॉलनीतील काही रहिवासी दूषित पाण्यामुळे आजारी पडले आहेत. 

मुंबई शहर आणि उपनगरात नुकताच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. वांद्रे येथील साहित्य सहवास आणि पत्रकार कॉलनीत दूषित पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी तेथील रहिवाशांनी पालिकेच्या विभागीय कार्यालयाकडे केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत पाण्याचे नमुने तपासले असता ते पाणी दूषित असल्याचे आढळून आले. या पाण्यामुळे काहीजण आजारी पडले असून, त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या भागात दूषित पाणी येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुधाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, साहित्य सहवास भागात दूषित पाण्याच्या तक्रार प्राप्त झाली असून, संबंधित वॉर्ड ऑफिसरला याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत असतात. दूषित पाण्यामुळे अमिबा, कॉलरा यासारखे विषाणू पोटात जाऊ शकतात. दूषित पाणी प्यायल्याने पोटाचा संसर्ग होऊ शकतो. उलट्या आणि जुलाब याने त्याची सुरुवात होते. काही वेळा थंडी वाजून तापही येऊ शकतो. तसेच काही रुग्णांमध्ये रक्तदाब कमी होण्याच्या तक्रारी आढळून येतात. अशावेळी तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे गरजेचे असते. तसेच पाणी उकळून व गाळून पिणे गरजेचे आहे. - डॉ. अनिल पाचनेकर, इंडिया मेडिकल असोसिएशन, माजी अध्यक्ष (महाराष्ट्र)

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामोसमी पाऊसपाणी