विक्रोळीकरांना दरडीचे, भांडुपकरांना नाल्याचे भय ; मनपा दखल घेत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 08:53 AM2024-08-29T08:53:19+5:302024-08-29T08:59:25+5:30
विक्रोळी पार्कसाईट आणि भांडुप टेंभीपाडा येथील स्थानिक नागरिक दरडीच्या सावटाखाली जीव मुठीत धरून आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :विक्रोळी पार्कसाईट आणि भांडुप टेंभीपाडा येथील स्थानिक नागरिक दरडीच्या सावटाखाली जीव मुठीत धरून आहेत. पार्कसाईट येथे केवळ दीड वर्षापूर्वी बांधलेली आधार भिंत व दरड कोसळल्याने चार घरे बाधित झालेली असून, काही दुकानांचेही या भिंतीमुळे नुकसान झाले आहे.
उत्तर-पूर्वचे महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी भिंत बांधण्याची मागणी केली आहे; तर, टेंभीपाडा येथील नाला खचला आहे. त्याला १२ दिवस होत आले असून, त्याचे पाणी लोकांच्या घरात घुसत आहे. मात्र अजूनही आमच्या तक्रारीची दखल पालिकेने घेतलेली नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडून अनेकांचे बळी जातात. त्यामुळे विक्रोळी पार्क साईट येथे आधारभिंत बांधण्यात आली होती. मात्र पहाटे लोकमान्यनगर, टाटा पॉवर हाऊसजवळ, वर्षानगर या ठिकाणी दरड कोसळली. ही दरड आधार भिंतीवर पडल्याने सर्व राडारोडा घरांवर पडला. त्यामुळे या घटनेत चार घरे व काही दुकानांचे नुकसान झाले. घटनास्थळावर युवासेना कार्यकारिणी सदस्या राजोल पाटील, स्थानिक नगरसेविका स्नेहल मोरे यांनी भेट दिली. आधारभिंत तातडीने बांधण्यात यावी, अशी मागणी संजय पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
नाल्यातील पाणी घरांमध्ये शिरते-
१) टेंभीपाडा पाइपलाइन, शिवछत्रपती क्रीडा मंडळ - पंचमशेठ चाळ येथील मोठा नाला जीर्ण झाला आहे. नाल्याचा काही भाग खचला आहे. पावसाळ्यात नाला काठोकाठ भरून पाणी चाळीतील घरांमध्ये शिरते.
२) चाळीतील छोट्या नाल्यावर लादी नसल्याने नाल्याचे पाणी बाहेर येऊन दुर्गंधी पसरते, अशी तक्रार गणेश जाधव यांनी पालिकेकडे केली आहे.
३) मात्र आमच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. सध्या निधी नाही, असे पालिकेच्या विभाग कार्यालयाकडून सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे.