Join us  

श्रीमंतांना आजही क्रेझ सेकंड होमची; गेल्या दीड वर्षात २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 10:24 AM

एकीकडे मुंबई शहरात घरांची विक्रमी विक्री होत असतानाच दुसरीकडे आता श्रीमंत मुंबईकरांनी मुंबईनजीक सेकंड होम घेण्यावरही जोर लावल्याचे दिसते.

मुंबई : एकीकडे मुंबई शहरात घरांची विक्रमी विक्री होत असतानाच दुसरीकडे आता श्रीमंत मुंबईकरांनी मुंबईनजीक सेकंड होम घेण्यावरही जोर लावल्याचे दिसते. गेल्या दीड वर्षात अलिबाग, लोणावळा, कर्जत, नेरळ, मुरबाड, लोणावळा ते थेट पाचगणीपर्यंत २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार झाल्याची माहिती आहे.

सेकंड होमची खरेदी का वाढतेय?

गेल्या काही वर्षांत मुंबईपासून अलिबाग, लोणावळा, खंडाळा, कर्जत अशा ठिकाणांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये मोठी बचत झाली आहे.

अलीकडेच ‘अटल सेतू’ सुरू झाल्यामुळे अलिबाग, पुणे अशा सर्वच ठिकाणी जाण्यासाठी वेळेत किमान ४० मिनिटांची बचत झाली आहे. त्यामुळे अशा ठिकाणी एका दिवसात किंवा वीक एंडसाठी जाण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यामुळेच अशा ठिकाणी सेकंड होम घेण्यासाठी लोक पुढे येत आहेत. 

भूखंड की बंगला?

ज्या श्रीमंत लोकांनी सेकंड होम घेतले आहे, त्यांचा प्रामुख्याने कल हा मोकळा भूखंड घेण्याकडे आहे. मोकळा भूखंड घेऊन त्यावर मनाप्रमाणे घर बांधण्याचा ट्रेण्ड सध्या दिसून येत आहे. त्यामुळे तयार बंगल्याची खरेदी करण्याकडे तुलनेने कमी कल आहे.

कुणी कुणी घेतली घरे?

१) अभिनेता रणवीर सिंग, दीपिका, शाहरूख खान, त्याची मुलगी, विश्वविजेत्या संघाचा कप्तान रोहित शर्मा, विराट कोहली, अनुष्का शर्मा, बिग-बी अमिताभ बच्चन अशा अनेक नामांकित व्यक्तिमत्त्वांनी गेल्या दोन वर्षांत मुंबईनजीक अनेक ठिकाणी सेकंड होम किंवा त्यासाठी भूखंडाची खरेदी केली आहे. 

२) अर्थात सेकंड होमची खरेदी ही केवळ श्रीमंतांकडूनच होते असे नाही. तर, यापैकी बहुतांश ठिकाणी मुंबईतील काही नामांकित विकासकांनी इमारतींचे प्रकल्प सादर केले आहेत. यामुळे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय लोकांनाही अशा ठिकाणी फ्लॅट घेऊन स्वतःचे सेकंड होमचे स्वप्न साकारता येणार आहे. 

टॅग्स :मुंबईबांधकाम उद्योगसेलिब्रिटी