Join us

‘लेप्टो’चा धोका; साचलेल्या पाण्यात जाणे टाळा; उंदीर, अन्य प्राण्यांच्या मलमूत्रामुळे बाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 10:27 AM

पावसाळ्यात साचलेल्या दूषित पाण्यातून ये-जा केल्यास लेप्टोस्पयारोसिसचा (लेप्टो) आजार होण्याची शक्यता अधिक असते.

मुंबई : पावसाळ्यात साचलेल्या दूषित पाण्यातून ये-जा केल्यास लेप्टोस्पयारोसिसचा (लेप्टो) आजार होण्याची शक्यता अधिक असते. उंदीर व अन्य प्राण्यांचे मलमूत्र साचलेल्या पाण्यात असते. शरीरावरील विशेषत: पायावर असलेली जखम अशा पाण्याच्या संपर्कात आल्यास ‘लेप्टो’ होतो. त्यामुळे साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नये. गेल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेतल्यास या आजाराचा प्रतिबंध करता येतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.  

महापालिका दरवर्षी रस्त्यावर पाणी तुंबू नये म्हणून प्रयत्न करते. मात्र, गेली अनेक वर्षे पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते. नागरिकांना दुसरा मार्ग नसल्याने पर्यायाने याच पाण्यातून ते वाट काढत जातात. या काळात अनेक घुशी, उंदीर बाहेर आलेले असतात. त्यांच्या मलमूत्रामुळे या पाण्यातून लेप्टोस्पयारोसिसचा संसर्ग नागरिकांना होतो.

काय काळजी घ्याल?

१) पावसाच्या तुंबलेल्या पाण्यातून चालू नये. जर चाललात, तर गुडघ्यापर्यंत गमबूट घालावेत. जेणेकरून दूषित पाण्याचा संपर्क येणार नाही.

२) पायावर कोणतीही जखम असेल तर त्यावर तत्काळ उपचार करावेत. कारण दूषित पाणी जखमेद्वारे शरीरात जाऊ शकते.

३) सांडपाण्याचा संपर्क आलेल्या पाण्यातून चालू नये.

४) तुंबलेल्या पाण्यातून चालून घरी आल्यावर पूर्ण शरीर स्वच्छ धुऊन घ्यावे.

५) तापासारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :मुंबईनगर पालिकापाऊससंसर्गजन्य रोग