रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 05:51 IST2025-04-22T05:50:27+5:302025-04-22T05:51:28+5:30
या काँक्रिटीकरणात टप्पा १ मधील रस्त्यांचे ७५ टक्के आणि टप्पा २ मधील ५० टक्के काँक्रिटीकरण ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे

रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
मुंबई - रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते काँक्रिटीकरणाचे प्रकल्प हाती घेतल्यामुळे यंदा पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे भरण्याच्या खर्चात मुंबई महापालिकेने ६० टक्के कपात केली आहे. गेल्यावर्षी खड्डे भरण्यासाठी २२० कोटींची निविदा काढण्यात आली होती, तर यंदा केवळ ७९ कोटी रुपयेच खर्च करण्यात येणार आहेत. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात गेल्यावर्षाच्या तुलनेत १४० कोटींची घट करण्यात आली आहे.
मुंबईतील रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. ते बुजवण्यासाठी विविध प्रयोग केले जातात. खड्ड्यांवरून महापालिकेला नेहमीच लक्ष्य करण्यात येते. खड्डे बुजवल्यानंतरही त्याच ठिकाणी पुन्हा-पुन्हा खड्डे पडत असल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्यामुळे पालिकेने रस्ते काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. महापालिकेच्या ताब्यात जवळपास २०५० किमीचे रस्ते आहेत. त्यांपैकी गेल्या काही वर्षांत १३३३ किमी म्हणजेच ६५ टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे.
उर्वरित रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे पालिकेने दोन टप्प्यांत हाती घेतली आहेत. या काँक्रिटीकरणात टप्पा १ मधील रस्त्यांचे ७५ टक्के आणि टप्पा २ मधील ५० टक्के काँक्रिटीकरण ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे यंदा खड्डे भरण्याच्या खर्चातही मोठी कपात करण्यात
आली आहे.
अभियंत्यांनी करावी रस्त्यांची पाहणी
मुंबईकरांचा रोष टाळण्यासाठी महापालिकेने रस्ते विभागातील सर्व अभियंत्यांना खड्डेपाहणी करा, असे निर्देश दिले होते. सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच समाज माध्यमांतून रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती पालिकेला मिळते. मात्र, त्यावर विसंबून न राहता पालिका अभियंत्यांनीच पाहणी करून उपाययोजना केल्या, तर टीकेला तोंड द्यावे लागणार नाही. चारचाकीऐवजी दुचाकीवरून फिरून रस्त्यांची पाहणी करण्याच्या सूचना गेल्यावर्षी करण्यात आल्या होत्या. यंदाही अशाच सूचना देणार असल्याचे कळते.