लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुलुंड पूर्वेतील म्हाडा कॉलनी येथे साईनाथ चौक ते बंगला डेड एंडपर्यंतच्या रस्त्याचे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून काँक्रिटीकरण केले आहे. दोन भागांत हे काम पूर्ण झाले. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू असतानाच अर्ध्या रस्त्यावर भेगा पडण्यास सुरुवात झाल्याने म्हाडावासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे बंगला क्रमांक ८ ते २३ याचे काम सुरू असतानाच रस्त्याला १५० ते २०० मीटरच्या रस्त्यावर ४० ते ५० ठिकाणी भेगा पडल्या आहेत. दोन टप्प्यात याचे काम पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील रस्त्याचे काम सुरू असताना पहिल्या टप्प्यात केलेल्या रस्त्याला या भेगा पडल्या आहेत.
याबाबत तक्रार केली असता दोन पॅच पूर्ण खोदून काम करण्यात आले. बाकी भेगांमध्ये सोल्युशन भरण्यात आले.
स्थानिक रहिवासी मयुरेश सावंत याने दक्षता विभागास तक्रार केली. दक्षता विभागाने कारवाई करण्याऐवजी मध्यवर्ती यंत्रणा रस्ते विभागास पत्र फॉरवर्ड करून त्याच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले. त्यानंतर या रस्त्याचे चार पॅच खोदून नवीन करण्यात आले. अन्य ३० भेगा तशाच राहिल्या. याबाबत पुन्हा दक्षता विभागास तक्रार दिली, त्यांनी पुन्हा मध्यवर्ती यंत्रणेस कळविले. यावर कोणतीही कारवाई न झाल्याने पुन्हा सावंत यांनी मध्यवर्ती यंत्रणेस काय कारवाई केली? असे विचारताच त्यांनी इतर भेगा जास्त खोल नसल्याचे उत्तर दिले. तसेच कंत्राटदारावर कोणतीही कारवाई केली नाही. या उलट त्याला पुन्हा दुसरे काम देण्यात आले.
कंत्राटदाराने गतिरोधकही हटवला-
१) स्थानिक रहिवासी रवी नाईक यांनी सांगितले, या भागात लहान मुलांची नर्सरी आहे. तेथे गतिरोधक होता तो कंत्राटदाराने कामादरम्यान हटवला. काम झाल्यानंतर गतिरोधकाची जागा बदलून व ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याच्या घरासमोरच गतिरोधक टाकला. त्यामुळे त्यांनी तो पूर्वी होता त्या ठिकाणीच करावा अशी तक्रार करताच तो काढण्यात आला. मात्र पूर्वी असलेला गतिरोधक पुन्हा बसविण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे.
२) या बाबत ‘टी’ वॉर्ड अधिकाऱ्यांनी हा गतिरोधक पूर्ववत करून द्यावा, असे पत्र मध्यवर्ती यंत्रणा रस्ते विभागास देऊनही अद्याप तो गतिरोधक बसविलेला नाही. या दिरंगाईमुळे नर्सरीमध्ये येणाऱ्या बालकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३) याच कंत्राटदाराच्या बेपर्वाईमुळे आर. आर. एज्युकेशन रोड करताना एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा अपघातात प्राण गमवावा लागला होता. याबाबत स्थानिक लोक प्रतिनिधींनी या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती, असेही त्यांनी नमूद केले.