Join us

मुंबईत गेल्या ६ महिन्यांत २ हजार ५०० आलिशान घरांची विक्री; दिल्ली अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 11:40 AM

ज्या घरांची किंमत किमान ४ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा घरांची विक्री गेल्या सहा महिन्यांत विक्रमी झाली आहे.

मुंबई : ज्या घरांची किंमत किमान ४ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा घरांची विक्री गेल्या सहा महिन्यांत विक्रमी झाली आहे. यामध्ये मुंबईत अडीच हजार घरांची विक्री झाल्याची माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या सर्वेक्षण कंपनीच्या अहवालातून पुढे आली आहे. अर्थात मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरांची विक्री झाली असली तरी या विक्रीमध्ये दिल्ली अव्वल ठरली असून, दिल्लीत जानेवारी ते जून या कालावधीमध्ये एकूण ३३०० घरांची विक्री झाली आहे.

जानेवारी ते जून या सहा महिन्यांत देशातील प्रमुख शहरांत एकूण ८५०० आलिशान घरांची विक्री झाली. गेल्यावर्षी याच कालावधीमध्ये ६,७०० घरांची विक्री झाली होती. यापैकी ८४ टक्के घरांची विक्री ही अनुक्रमे दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शहरांत झाली. हैदराबाद येथे सहा महिन्यांत १,३०० घरांची विक्री झाली आहे. पुण्यात आलिशान घर खरेदीचाही जोर वाढल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीमध्ये पुण्यात २०० आलिशान घरांची विक्री झाली होती. 

यंदाच्या वर्षीच्या सहा महिन्यांत यात तब्बल ४५० टक्के वाढ होत १,१०० घरांच्या विक्रीची नोंद झाली आहे. आलिशान घरांच्या विक्रीमध्ये दक्षिण मुंबईने आपला वरचष्मा कायम राखला आहे. विक्रीमध्ये एकट्या दक्षिण मुंबईत ३७ टक्के घरांची विक्री झाली. दक्षिण मुंबई वगळता ग्राहकांनी दुसरी पसंती वरळीला दिल्याचे दिसून आले. लोअर परळ, प्रभादेवी, वांद्रे, जुहू, ओशिवरा, अंधेरी आणि गोरेगाव येथे आलिशान घरांच्या खरेदीला ग्राहकांनी पसंती दिल्याचे दिसून आले आहे. उपनगरात सर्वाधिक ८८१ कोटी रुपयांचे व्यवहार हे गोरेगाव येथे झाले आहेत.

सहा महिन्यांतील विक्रमी उलाढाल-

१) मुंबई शहरात झालेल्या आलिशान घरांच्या विक्रीमध्ये विक्रमी आर्थिक उलाढाल झाली आहे. सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबई शहरात तब्बल १२ हजार ३०० कोटींची उलाढाल झाली आहे. 

२) या घरांचे किमान आकारमान दोन हजार चौरस फूट आणि त्यापेक्षा अधिक आहे. १२ हजार ३०० कोटी रुपयांपैकी ३५०० कोटी रुपयांची घरे ही रिसेलमधील आहेत. 

टॅग्स :मुंबईदिल्लीबांधकाम उद्योग