लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : श्रावण महिन्यात सणवार सुरू होतात, शिवाय श्रावणी सोमवार हे काही सणावारांपेक्षा कमी नसतात. या महिन्यात काही जण केसही कापत नाहीत आणि दाढीसुद्धा करत नाहीत. यामुळे सलून व्यावसायिकांना मोठा फटका बसतो. मात्र, श्रावण महिना संपला असल्याने आता पुन्हा ग्राहक सलूनकडे वळतील. त्यामुळे सलून व्यावसायिकांनी व्यवसायात तेजीचा विश्वास व्यक्त केला आहे.
श्रावण महिना मंदीचा-
१) मुंबईमध्ये हजारो सलून आणि स्टायलिंग स्टुडिओ आहेत. ग्राहकांची संख्या लाखोंची असली तरी हजारो ग्राहक श्रावणात दाढी करणे, केस कापणे टाळतात. त्यामुळे प्रचंड प्रमाणात व्यवसाय खाली येतो.
२) त्यामुळे श्रावण महिना व्यवसायाच्या दृष्टीने मंदीचा असल्याचे सलून व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
३) श्रावण महिन्यात शिवभक्त भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष प्रार्थना करतात.
४) या महिन्यात अनेक प्रकारची कामे थांबवली जातात. कांदा आणि लसूण यांचे सेवन बंद केले जाते.
व्यावसायिक पुन्हा जोमाने काम करण्यासाठी सज्ज-
सोबतच या महिन्यात केस कापणेदेखील निषिद्ध मानले जाते. श्रावणमध्ये केस न कापण्याची परंपरा प्राचीन समजुतींवर आधारित आहे. ही समजूत पाळली जात आहे. यामुळेच आजही काही घरांमध्ये श्रावणामध्ये केस कापण्यास मनाई केली जाते. परंतु, आता श्रावण संपत आल्यामुळे हे व्यावसायिक पुन्हा जोमाने काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
पूर्वी मोठ्या प्रमाणात हे नियम पाळले जायचे. आता साधारणतः ४० ते ५० टक्के लोक श्रावणात केस न कापणे, दाढी न करणे हे नियम पाळतात. परंतु, श्रावण महिना संपल्यानंतर सलून व्यवसायात तेजी येते. - आशिष काशीद, सलून व्यावसायिक, चेंबूर