Join us

मुंबईकरांनो, ‘बेस्ट’ बचाओ..! आजपासून मोहीम; ‘क्यूआर कोड’द्वारे सूचना पाठविण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 9:37 AM

‘बेस्ट’ वाचवण्यासाठी या आठवड्यापासून प्रत्येक स्थानकावर क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत.

मुंबई : राज्य सरकारच नव्हे, तर महापालिकेनेही ठेंगा दाखविल्याने अडचणीत आलेल्या ‘बेस्ट’ला वाचविण्यासाठी आता मुंबईकरांनीच एकत्र येऊन आवाज उठविण्याचा निर्धार केला आहे. प्रवासी संघटना, सामाजिक संघटना आणि बेस्ट संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘बेस्ट’चा स्वमालकीच्या बसचा ताफा केवळ ३३ टक्के उरला आहे. 

‘बेस्ट’ वाचवण्यासाठी या आठवड्यापासून प्रत्येक स्थानकावर क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. त्याद्वारे सामान्य मुंबईकरांच्या सूचना व सल्ले तसेच संकल्पना एकत्रित करण्यात येतील. त्यानंतर बेस्ट बचाव मोहिमेसाठी नियोजन आखण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली. मुंबईतील दररोज तब्बल ३१ लाख प्रवाशांना आपल्या इच्छितस्थळी सुरक्षित पोहोचविणाऱ्या व मुंबईच्या प्रवासी वाहतुकीचा कणा असणाऱ्या ‘बेस्ट’ला वाचविण्याची मोहीम युनियनमार्फत हाती घेण्यात आली आहे. यासंदर्भातील पहिली बैठक गोरेगावात झाली.  

बस ‘बेस्ट’च्या मालकीच्या-

१) बेस्ट बसची सेवा सुरळीत चालावी यासाठी बेस्टच्या ताफ्यात एकूण ३,३३७ बसची गरज आहे; मात्र केवळ १,०८५ बस बेस्टच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत.

२) त्यापैकी ७६१ बस ३१ मार्च २०२५ रोजीपर्यंत भंगारात निघणार आहेत. त्यानंतर बेस्टच्या बसची संख्या आणखी घटणार आहे. त्यामुळे बेस्टसाठी नव्या बस टप्प्याटप्प्याने खरेदी करून प्रवासी सेवेत आणणे व त्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची गरज आहे. 

३) खासगी बसवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही; तसेच खासगी बसची नियमित देखभाल-दुरुस्तीही होत नसल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. त्यामुळे बेस्टच्या स्वमालकीच्या बस ताफ्यात असणे आवश्यक असल्याचे बेस्टसाठी लढा देणाऱ्या संघटनांनी मंडला आहे. 

अशी आहे मुंबईकरांची ‘बेस्ट’-

१) दररोज प्रवासी- ३१ लाख

२) स्वत:च्या बस - १,०८५

३१ मार्च २०२५ पर्यंत ७६१ बस भंगारात निघणार. बेस्टला वाचविण्यासाठी नव्या बसची खरेदी, हाच एकमेव पर्याय.

सरकारकडून प्रयत्न नाहीत-

१) मागील सहा वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या ‘बेस्ट’चे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणत्याही प्राधिकरणाने ठोस पुढाकार घेतलेला नाही. 

२) राज्य सरकार व महापालिका प्रशासनाने हा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळेच आम्ही मुंबईकरांच्या दरबारात जाऊन जनजागृती करण्याचे ठरविले आहे. ३) मुंबईकरांना किफायतशीर दरात चांगली व दर्जेदार सेवा पुरविणे हा बेस्टचा मूळ उद्देश असला, तरी त्याचा महापालिका प्रशासनाला सोयिस्कर विसर पडल्याचे शशांक राव यांनी सांगितले.

बेस्टच्या ताफ्यातील खासगी बस वेळेवर धावत नाहीत. खासगी बसमध्ये अनेकदा तांत्रिक बिघाड होतो. त्याकडे वेळेवर लक्ष दिले जात नाही. त्याचा प्रवाशांना फटका बसतो. उत्तम सेवा मिळण्यासाठी, बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाढणे गरजेचे आहे. पालिका आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मुंबईकरांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईतील प्रवासी संघटना, सामाजिक संघटना यांना एकत्र करून ‘बेस्ट बचाओ’ अभियान राबविले जाणार आहे. - शशांक राव, सरचिटणीस, बेस्ट वर्कर्स युनियन

टॅग्स :मुंबईबेस्ट