लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महापालिकेच्या मुलुंड विभागात घनकचरा विभागाकडून आणि विभागीय तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने कचरा घोटाळा होत असल्याचा दावा स्थानिक रहिवाशाने केला आहे.
पालिकेने विभागातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराकडून कचऱ्याऐवजी विकासकांचे डेब्रिज उचलण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे कचरा उचलण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप ॲड. सागर देवरे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
मुलुंड विभागात रस्त्याच्या कडेला टाकला जाणारा, तसेच रहिवाशांच्या घरातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो पालिकेने आखून दिलेल्या भूखंडावर टाकण्यासाठी कोट्यवधींचे कंत्राट पालिकेने कंत्राटदाराला दिले आहे, अशी माहिती देवरे यांनी दिली. मात्र, पालिकेच्या जागेत कंत्राटदाराकडून विकासकांच्या इमारतींच्या पाडकामाचा राडारोडा टाकला जात असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले आहे. शिवाय हा राडारोडा उचलण्यासाठी कंत्राटदार विकासकांकडूनही प्रत्येक गाडीमागे पैसे घेत असल्याचा दावा स्थानिक करत आहेत. एकूणच हा कंत्राटदार पालिका व विकासक या दोघांकडून पैसे उकळत असल्याचे देवरे यांनी पत्रात म्हटले आहे.
भूखंड इंटरटेनमेंट पार्कसाठी आरक्षित-
कंत्राटदार ज्या भूखंडांवर राडारोडा टाकत आहे, तो भूखंड इंटरटेनमेंट पार्कसाठी आरक्षित आहे. या ठिकाणावरील बेकायदा बांधकामावरील कारवाईबाबत ॲड. सागर देवरे यांची याचिका हरित लवादाकडे प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पालिकेकडून या जागेत राडारोडा टाकण्याची परवानगी कशी दिली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.