मुंबई : विमान कंपनीत कामाला असल्याचे भासवून स्वस्तात काश्मीर सहलीच्या नावाने फसवणूक करणाऱ्याविरुद्ध जे. जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेत इंटेरियर डिझायनरची लाखोंची फसवणूक करण्यात आली.
गॅब्रीयल दुबे (५२) यांच्या तक्रारीनुसार, सायन परिसरात राहणारा त्यांच्या ओळखीचा उमेश सहानी याने तो एअर इंडिया कंपनीत कामाला असल्याचे दुबे यांना सांगितले होते. दुबे यांनी त्याच्याकडे काश्मीर सहलीबाबत चौकशी केली, तेव्हा सहानीने मार्च ते मे २०२४ या कालावधीत दुबे व त्यांच्या कुटुंबियांना स्वस्तात काश्मीरमधून येण्या-जाण्याची, तिकिटाची, राहण्याची व्यवस्था स्वस्तात करून देण्याचे आमिष दाखवले. दुबे यांनी तिकिटासाठी दोन लाख आठ हजार रुपये सहानीला दिले. तसेच काश्मीरमध्ये राहणे, खाणे व फिरण्यासाठी एक लाख पाच हजार रुपये दिले. यातील तक्रारदार दुबे यांनी एकूण तीन लाख १३ हजार रुपये आरोपीला दिले. मात्र आरोपीने तक्रारदार यांची राहण्याची, फिरण्याची कोणतीही सुविधा केली नाही. तसेच विमानाचे तिकीटही काढले नाही.
चेक वठलाच नाही -
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गॅब्रीयल दुबे यांनी पैशांची मागणी केली तेव्हा सहानीने तक्रारदारांना धनादेश दिला होता. मात्र बँक खात्यात पैसे नसल्यामुळे तो वठला नाही. याप्रकरणी दुबे यांनी जे. जे. मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.