‘अंजुमन-ए-इस्लाम’च्या बसला अपघात; जे. जे. उड्डाणपुलावरील रेलिंगला धडक; ३ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 09:45 AM2024-06-27T09:45:45+5:302024-06-27T09:48:50+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील अंजुमन-ए-इस्लाम शाळेच्या बसने बुधवारी सकाळी जे. जे. उड्डाणपुलाच्या रेलिंगला धडक दिली.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील अंजुमन-ए-इस्लाम शाळेच्या बसने बुधवारी सकाळी जे. जे. उड्डाणपुलाच्या रेलिंगला धडक दिली. त्यात दोन विद्यार्थी आणि बस सहायक जखमी झाले. बसचालकाने अन्य वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना, ही घटना घडल्याची शक्यता आहे.
अंजुमन-ए-इस्लाम शाळेची बस सकाळी ६:३० च्या ३० विद्यार्थ्यांना घेऊन जे. जे. उड्डाणपुलावरून ‘सीएसएमटी’च्या दिशेने जात होती. एका धोकादायक वळणावर पुलाच्या रेलिंगला या बसने धडक दिली. त्यात शेख अब्दुल्ला हा इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी बस बाहेर फेकला गेला, तसेच बस सहायकासह इतर काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. अब्दुल्ला याला प्रथम जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याच्या तोंडाला आणि हाताला मार लागल्याने पुढील उपचारांसाठी त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तेथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती अंजुमन-ए- इस्लाम संस्थेचे अध्यक्ष झहीर काझी यांनी दिली. बसचा सहायक सूर्यभान वीरेंद्रकुमार याला जीटी रुग्णालयात दाखल केले आहे. तर, अन्य एका विद्यार्थिनीवर शिवडी नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत.
‘फलक हटवा’-
जे. जे. पुलावरील एका वळणावर एक मोठा फलक असून, तो मोठ्या वाहनांना अडथळा ठरतो. हा फलक हटविण्याकरिता आरटीओला पत्र लिहिले आहे, अशी माहिती शाळेच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
बस चालकावर गुन्हा -
या अपघाताप्रकरणी बसचालक लालूकुमार कंतू राजभवन (वय २४) याच्यावर निष्काळजीने वाहन चालविल्याप्रकरणी पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.