‘पीक अवर’ला स्कूल बसमुळे उडेल वाहतुकीचा बोजवारा; तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:17 AM2024-04-24T10:17:41+5:302024-04-24T10:18:45+5:30
सकाळी ९ वाजेनंतर पाचवीपर्यंतचे वर्ग भरविण्यामुळे गोंधळ उडणार.
सचिन लुंगसे, मुंबई : सकाळी ९ वाजेनंतर पाचवीपर्यंतचे वर्ग भरविण्याच्या निर्णयामुळे ऐन ‘पीक अवर’ला रस्त्यांवर उतरणाऱ्या स्कूल बसमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडेल. वाहतूक कोंडीमुळे लहान मुलांना शाळेत पोहोचण्यास उशीर होण्यासह रस्त्यांवर निर्माण होणाऱ्या बॉटल नेकमुळे इतर वाहनांनाही फटका बसेल. त्यामुळे आता असलेली शाळांची वेळ योग्य आहे, असे वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वाहतूक तज्ज्ञ विद्याधर दाते यांच्या मते, पाचवीपर्यंतच्या शाळा सकाळी लवकर भरविण्याच योग्य होईल. पाचवीपर्यंतचे वर्ग जर ९ वाजेनंतर भरविले तर या वेळेत रस्त्यांवर येणाऱ्या स्कूल बसला ‘पीक अवर’मधील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. त्यामुळे मुलांना शाळेत पोहोचविण्यास विलंब होईल. शिवाय मोठ्या संख्येने रस्त्यांवर दाखल होणाऱ्या स्कूल बसचा उर्वरित वाहतुकीला त्रास होईल. नऊनंतर शाळा भरवायच्याच झाल्या तर या वेळेत रस्त्यांवर येणाऱ्या स्कूल बसला वाहतुकीसाठी प्राधान्य द्यावे लागेल.
वाहतूकतज्ज्ञ रोहित कात्रे यांच्या मते नऊनंतर शाळा भरविल्या आणि या वेळेत स्कूल बस रस्त्यांवर आल्या तर कोंडीत भर पडेल. रस्ता मोठा असो किंवा छोटा, बॉटल नेक तयार झाला तर सगळीच वाहतूक कोंडीत सापडेल. शाळेची बस ऐन ‘पीक अवर’ला विद्यार्थ्यांना बसण्यासाठी रस्त्यावर थांबली तर त्याचा त्रास सगळ्यांनाच होऊ शकतो.
वाहतूक प्रश्नांवर काम करणारे गोपाळ झवेरी यांच्या मते सकाळी ९ ते ११ दरम्यान रस्त्यावर ‘पीक अवर’ असतो. ऑफिसला जाण्यासाठी लोक घराबाहेर पडलेले असतात. यावेळी स्कूल बस आणि इतर वाहनांची गर्दी रस्त्यावर वाढली तर शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकरांनाही लेट मार्क लागेल. बहुतेक पालक शाळेच्या बसव्यतिरिक्त मुलांना शाळेत सोडण्यासाठी रिक्षा, टॅक्सीसारख्या वाहनांचा वापर करतात. ही वाहने गर्दीमध्ये भर टाकतील. शाळेच्या बस रस्त्यालगत थांबल्या तर निर्माण होणारा बॉटल नेक वाहतूक कोंडीमध्ये भर घालणारा ठरेल.
शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा उपस्थित होऊ शकतो मुद्दा- निवृत्त पोलिस महासंचालक डॉ. पसरीचा यांचे मत
१) शाळेची वेळ ९ नंतर केल्यास वाहतुकीवर आणखी ताण येत मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, असे निवृत्त पोलिस महासंचालक डॉ. पी. एस. पसरीचा यांनी सांगितले. प्रशासनाने यावर विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
२) सकाळच्या वेळी आधीच कोंडी असते. शाळेजवळच्या लहान रस्त्यांमुळेही अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यात सकाळी ९ नंतर मुंबईसारख्या शहरात ऑफिसला जाणाऱ्यांचीही मोठी लगबग असते. त्यामध्ये शाळेच्या बसही वाढल्यास वाहतूककोंडीच्या समस्येत भर पडू शकते.
३) बाहेरच्या देशात वेळेबाबत शिस्त दिसून येते. लहान मुलांनाही तीच सवय असणे गरजेचे आहे. शाळेच्या बस पीक अवरमध्ये रस्त्यावर आल्यास त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांनाच सहन करावा लागू शकतो, असेही त्यांनी सांगितले.