अपुऱ्या पाण्यामुळे शाळांना अर्धा दिवस सुट्टी; कुर्ला, चुनाभट्टी परिसराला टंचाईची झळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 09:49 AM2024-07-04T09:49:39+5:302024-07-04T09:52:09+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्याने महापालिकेने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्याने महापालिकेने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. यामुळे अनेक भागांत टंचाईची झळ बसू लागली आहे. याचाच फटका आता शाळांनाही बसला आहे. मुंबईच्या ‘एल’ वॉर्डअंतर्गत येणाऱ्या कुर्ला, चुनाभट्टी परिसरातील अनेक शाळांमध्ये कमी प्रमाणात पाणी आल्याने शाळा बुधवारी अर्धवेळ भरविण्यात आल्या. येत्या काही दिवसांत पावसाअभावी पाणीसाठा आणखी खालावल्यास मुंबईमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवण्याची भीती शिक्षक, मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांत सध्या आठ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे महापालिकेने पाणी कपात लागू केली असून, त्याचा फटका रहिवाशांसह उद्योग, व्यवसाय आणि आता शाळांनाही बसू लागला आहे. शाळांना पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी गरज असते. अपुरे पाणी आल्याने बुधवारी शाळांना फटका बसला.
मुंबईतील काही भाग डोंगराळ असल्यामुळे, तर काही ठिकाणी पाण्याच्या जलवाहिन्या जुन्या असल्यामुळे कमी दाबामुळे पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. कुर्ला येथील गांधी बाल मंदिर शाळेसारख्या शाळांना त्यांची दोन्ही सत्रे लवकर सोडावी लागली. त्यामुळे महापालिकेने पुरेशा दाबाने आणि पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी मुंबईतील नागरिकांकडून होता आहे.
बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी अपुरे पाणी आले. त्यामुळे अनेक शाळांच्या विद्यार्थी आणि शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. पिण्याचे आणि वापराचे पाणीच नसल्याने प्राथमिक व माध्यमिक सत्राची शाळा अर्धा दिवस लवकर सोडणे मुख्याध्यापकांना अपरिहार्य ठरले आहे. परिणामी, मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही समस्या लवकरात लवकर सुटणे अत्यंत गरजेचे आहे. मोठ्या विद्यार्थी संख्येच्या शाळांनी विकत पाणी घेणे परवडणारे नाही, तसेच ते पिण्यायोग्य असेलच याचीही शाश्वती नाही.- अनिल पांचाळ, मुख्याध्यापक, गांधी बाल मंदिर हायस्कूल, कुर्ला.
कुर्ला परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने व्यवस्थापन करणे कठीण होत आहे.- जीन गोम्स, मुख्याध्यापिका, मायकेल हायस्कूल
धरणांमध्ये पुरसे पाणी नसल्यामुळे प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही भागांत कमी दाबाने पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. मात्र त्यांनी यासंदर्भात पालिकेच्या विभाग कार्यालयाला याची माहिती द्यावी, आम्ही यावर कार्यवाही करू. - धनाजी हर्लेकर, वॉर्ड ऑफिसर, एल वॉर्ड