Join us  

उपवास करताय; 'बेस्ट बिफोर' पाहिले का? अन्न पदार्थांच्या पाकिटावरील उत्पादन तारीख पाहणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 10:18 AM

श्रावण हा व्रतवैकल्याचा महिना. या महिन्याच्या सोमवारी व शनिवारी हमखास घरातल्या महिला उपवास करतात.

मुंबई : श्रावण हा व्रतवैकल्याचा महिना. या महिन्याच्या सोमवारी व शनिवारी हमखास घरातल्या महिला उपवास करतात. आता पुरुषही उपवास धरू लागले आहेत. त्यानिमित्ताने घराघरांत उपवासाचे पदार्थ बनविले जातात किंवा बाहेरून मागवले जातात. मात्र, उपवासाचे पदार्थ बनविण्यासाठी आणलेल्या खाद्यपदार्थांवर 'बेस्ट बिफोर' पाहूनच खरेदी करा, असा सल्ला अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात येत आहे.

श्रावण महिन्यात घरात गोडाधोडाचे व उपवासाच्या पदार्थांची चंगळ असते. या महिन्यात अधिक प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करण्यात येते. प्रथिने शरीरासाठी आवश्यक असली तरी त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास अॅसिडीटी वाढते.

रेडिमेड पदार्थ घेताना ही काळजी घ्या-

विनाबिलाने खरेदी करू नका: कुठलाही खाद्यपदार्थ खरेदी करताना खाद्य विक्रेत्याकडून बिल घ्या. अन्नाचा परवानाही पाहा.

पॅकबंद अन्नच खरेदी करा: उघडे अन्नपदार्थ खाण्याऐवजी पॅकबंद अन्न खरेदी करा. हे पदार्थ खाण्यासाठी अधिक सुरक्षित असतात.

उत्पादन तारीख आणि 'बेस्ट बिफोर' अवश्य पाहा: पॅकबंद खाद्यपदार्थ खरेदी करत असाल, तर त्या पाकिटावर असलेली उत्पादन तारीख आोण 'बेस्ट बिफोर' अवश्य पाहा.

कुठे तक्रार कराल?

सणासुदीच्या काळात सर्रासपणे विक्रेते अन्नपदार्थात भेसळ करून नागरिकांची फसवणूक करतात. मुदत टळून गेलेले, शिळे किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ नागरिकांच्या माथी मारतात. अन्न पदार्थाबाबत तक्रार असल्यास सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करावी.

टॅग्स :मुंबईआरोग्यहेल्थ टिप्स