मेट्रो स्थानकांच्या नावांची विक्री; ३६ कोटींची कमाई, ५ वर्षांसाठी कंपन्यांना नावांचे अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 10:02 AM2024-06-15T10:02:42+5:302024-06-15T10:05:14+5:30

पाच वर्षांसाठी नावांच्या अधिकार विक्रीतून ही रक्कम मिळाली आहे. 

in mumbai sells of metro 2 station names rights 36 crore revenue naming rights for 5 years to signpost company | मेट्रो स्थानकांच्या नावांची विक्री; ३६ कोटींची कमाई, ५ वर्षांसाठी कंपन्यांना नावांचे अधिकार

मेट्रो स्थानकांच्या नावांची विक्री; ३६ कोटींची कमाई, ५ वर्षांसाठी कंपन्यांना नावांचे अधिकार

मुंबई : डी. एन. नगर ते दहिसर या मेट्रो २ अ मार्गिकेवरील लोअर मालाड आणि मालाड पश्चिम या दोन मेट्रो स्थानकांच्या नावांच्या अधिकार विक्रीतून महामुंबई मेट्रो संचलन मंडळाच्या तिजोरीत ३६ कोटी रुपये जमा झाले आहेत. पाच वर्षांसाठी नावांच्या अधिकार विक्रीतून ही रक्कम मिळाली आहे. 

एमएमआरडीएकडून मुंबई महानगरात ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभारले जात आहे. मेट्रो मार्गिकांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज एमएमआरडीएने घेतले आहे; मात्र मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर केवळ तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून मेट्रोच्या संचलनाचा खर्च आणि या मेट्रो मार्गिकांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य नाही. त्यामुळे एमएमआरडीएकडून तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य पर्यायांच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार स्थानकांच्या नावांचे अधिकार, जाहिरातींचे हक्क, मेट्रो मार्गिकांवर किरकोळ विक्री दालनांसाठी जागा भाड्याने देऊन उत्पन्नाचे मार्ग तयार केले जात आहेत. 

त्याचबरोबर आता संचलन मंडळाकडून दोन स्थानकांच्या नावांच्या अधिकारांची विक्री करण्यात आली आहे. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवरील एकूण ३० स्थानके आहेत. सद्यःस्थितीत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवरून २ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. या प्रवासी संख्येत आणखी वाढीची अपेक्षा आहे.

१) संचलन मंडळाने साईनपोस्ट या कंपनीला दोन मेट्रो स्थानकांच्या नावाचे अधिकार ३६ कोटी रुपयांना दिले आहेत.

२) या कंपनीने मालाड पश्चिम स्थानकाच्या नावांचे अधिकार मोतीवाल ओसवाल कंपनीला दिले आहेत. त्यामुळे आता मालाड पश्चिम स्थानकाच्या नावाच्या आधी मोतीवाल ओसवाल कंपनीचे नाव लागणार आहे.

३) याप्रमाणे अन्य मेट्रो स्थानकांच्या नावांचे अधिकार विकले जाणार आहेत. त्यातूनही चांगले उत्पन्न मिळण्याची संचलन मंडळाला अपेक्षा आहे.

४) यातून मेट्रो मार्गिकेच्या उभारणीसाठी झालेला खर्च काही प्रमाणात वसूल होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: in mumbai sells of metro 2 station names rights 36 crore revenue naming rights for 5 years to signpost company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.