Join us

सायन, कुर्ल्यात यापुढे धारावीतून जावे लागणार; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 10:03 AM

विद्यार्थी-पालक, नोकरदारांना बसणार हेलपाटा. 

मुंबई : सायन पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्याकरिता वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. बी. ए. रोडवरून सायन पुलावरून पश्चिम वाहिनीमार्गे एल. बी. एस. मार्ग, संत रोहिदास मार्गाकडे जाणारी वाहतूक तसेच कुर्ला वाहतूक विभागातून एल. बी. एस. मार्ग आणि संत रोहिदास मार्गाने पुलावरून, तर पूर्व वाहिनीवरून बी. ए. रोड मार्गे जाणारी वाहतूक १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत तात्पुरती बंद केली जाणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. 

कुर्ल्याकडून एल.बी.एस. रोड व संत रोहिदास मार्गाने सायन रेल्वेस्थानकजवळून सायन पुलाच्या पूर्ववाहिनीने जाणाऱ्या वाहतुकीपैकी हलकी वाहने ही पैलवान नरेश माने चौक येथे उजवे वळण घेऊन पुढे संत रोहिदासमार्गे, अशोक मिल नाका येथे डावे वळण घेऊन पुढे के.के. कृष्णन मेनन मार्ग (९० फूट)ने कुंभारवाडा जंक्शन डावे वळण घेऊन सुलोचना शेट्ये मार्गाने सायन रुग्णालय पूल (कुंभारवाडा पूल)मार्गे वळविण्यात आली आहेत.

कुर्ल्याकडून एल.बी.एस. रोडने सायन रेल्वेस्थानक येथून सायन पूल पूर्ववाहिनीने जाणाऱ्या वाहतुकीपैकी अवजड वाहने ही पैलवान नरेश माने चौकापूर्वी धारावी कचरपट्टी जंक्शन सिग्नल येथे उजवे वळण घेऊन धारावी डेपो रोडने पुढे सायन-वांद्रे लिंक रोड, धारावी टी-जंक्शन येथून जातील.

प. द्रुतगती व कलानगरकडून सायन-वांद्रे लिंक रोडने येणारी वाहने धारावी टी-जंक्शन येथून उजवे वळण घेऊन केमकर चौक डावे वळण घेऊन ६० फुटी मार्गाने कुंभारवाडा पूल मार्गे जातील.

पश्चिम वाहिनी बंद केल्याने वळविलेले मार्ग-

डॉ. बी. ए. रोड दक्षिण वाहिनी-सायन जंक्शनवरील वाहतूक सायन सर्कल, सायन रुग्णालय जंक्शन येथून सुलोचना शेट्टी मार्गाने पुढे कुंभारवाडा जंक्शन येथून जाईल.

कुर्ला व धारावीकडे ... 

कुंभारवाडा जंक्शन येथून के. के. कृष्णन मेनन मार्ग- संत रोहिदास मार्ग-पैलवान नरेश माने चौक येथून डावे वळण घेऊन जाता येईल.

पश्चिम द्रूतगती मार्ग व वांद्रेकडे ... 

कुंभारवाडा जंक्शन येथून सरळ संत कबीर मार्ग- केमकर चौक- सायन माहीम लिंक रोडने टी. जंक्शन येथून कलानगर जंक्शन मार्गे जाता येईल.

माहीमकडे - कुंभारवाडा जंक्शन... येथून माटुंगा लेबर कॅम्प पुढे टी. एच. कटारिया मार्गे किंवा कुंभारवाडा जंक्शन येथून संत कबीर मार्ग-केमकर चौक येथून रहेजा मार्गे जाता येईल. 

डॉ. बी. ए. रोड उत्तर वाहिनीवरून येणारी वाहतूक सायन रुग्णालय जंक्शन - कुंभारवाडा जंक्शन मार्गे जाईल.

कुर्ला व धारावीकडे...

कुंभारवाडा जंक्शन येथून वाहने के. के. कृष्णन मेनन- संत रोहिदास मार्ग-पैलवान नरेश माने चौकातून जातील.

कुर्ल्याकडे...

डॉ. बी. ए. रोडच्या दोन्ही वाहिन्यांवरून येणारी अवजड वाहने सायन रुग्णालय-सुलोचना शेट्टी मार्ग- कुंभारवाडा जंक्शन-सायन-वांद्रे लिंक रोड-एल. बी. एस. मार्गाने जातील.

 या ठिकाणी नो-पार्किंग -

१) संत कबीर मार्ग (६० फूट) - सायन रुग्णालय पूल (कुंभारवाडा पूल) ते केमकर चौकापर्यंत दोन्ही वाहिन्या 

२) सायन-माहीम लिंक रोड - टी जंक्शन ते माहीम फाटकापर्यंत दोन्ही वाहिन्या

३) माटुंगा लेबर कॅम्प - टी. एच. कटारिया मार्ग हा कुंभारवाडा जंक्शन ते शोभा हॉटेलपर्यंत दोन्ही वाहिन्या

४) सुलोचना शेट्टी मार्ग - सायन रुग्णालय जंक्शन ते सायन रुग्णालय गेट नं. ७ पर्यंत दोन्ही वाहिन्या

५) भाऊ दाजी रोड - सायन रुग्णालय गेट नं. ७ ते रेल्वे पूल दोन्ही वाहिन्या 

६)  संत रोहिदास मार्ग - पैलवान नरेश माने चौक ते वाय जंक्शन दोन्ही वाहिन्या

७) सायन-वांद्रे लिंक रोड - वाय जंक्शन ते टी जंक्शन दोन्ही वाहिन्या

८) धारावी डेपो रोड वाय जंक्शन ते कचरपट्टी जंक्शन एल. बी. एस. रोड दोन्ही वाहिन्या

९)  के. के. कृष्णन मेनन मार्ग (९० फूट) रोड - कुंभारवाडा जंक्शन ते अशोक मिल नाका दोन्ही वाहिन्या

टॅग्स :मुंबईनगर पालिकाधारावीकुर्ला