पोलीस चौकीजवळील सहा दुकाने फोडली; मुलुंडमध्ये ५१ हजारांचा ऐवज लुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 10:59 AM2024-09-04T10:59:22+5:302024-09-04T11:01:48+5:30
सोमवारी पहाटेच्या सुमारास स्टेशन रोड ते हनुमान चौकापर्यंतच्या पाच ते सहा दुकानांमध्ये ही चोरी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुलुंड स्टेशनच्या पूर्वेकडील पोलिस चौकीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पाच ते सहा दुकानांचे टाळे तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह एकूण ५१ हजारांचा मुद्देमाल लुटला आहे. चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, नवघर पोलीस तपास करत आहेत.
सोमवारी पहाटेच्या सुमारास स्टेशन रोड ते हनुमान चौकापर्यंतच्या पाच ते सहा दुकानांमध्ये ही चोरी झाली आहे. यावेळी आणखी दोन दुकानांचे टाळे तोडून चोरीचा प्रयत्नही या चोरट्यांनी केला. मात्र तो प्रयत्न फसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
‘बंदोबस्त वाढवा’-
मुलुंड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी हेमंत जैन यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन पाटील यांची भेट घेत या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्याची विनंती केली आहे. नऊ महिन्यांपूर्वी येथील गजेंद्र जैन यांच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र अद्याप काहीचे कारवाई झालेली नाही.