गणेशोत्सवात ‘बेस्ट बचाओ’चा नारा; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत मंडळांचे जनजागृतीपर देखावे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 10:37 AM2024-09-17T10:37:56+5:302024-09-17T10:42:34+5:30

बेस्ट प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी ‘बेस्ट बचाव अभियान’ अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत पोहोचावे, यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना साद घातली होती.

in mumbai slogan of best bachao in ganeshotsav public awareness campaigns by boards regarding public transport system  | गणेशोत्सवात ‘बेस्ट बचाओ’चा नारा; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत मंडळांचे जनजागृतीपर देखावे 

गणेशोत्सवात ‘बेस्ट बचाओ’चा नारा; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत मंडळांचे जनजागृतीपर देखावे 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बेस्ट प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी ‘बेस्ट बचाव अभियान’ अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत पोहोचावे, यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना साद घातली होती. त्यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी ‘बेस्ट’ उपक्रमाला पाठिंबा देत बेस्ट बचाव अभियानाचे देखावे साकारले आहेत. 

 बेस्टच्या स्वमालकीच्या बसचा कमी होत चाललेला ताफा आणि अल्पदरात उपलब्ध होणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला लागलेली घरघर याबाबत जनजागृती करणारे फलक आणि आकर्षक देखावे साकारले आहेत.

मुंबईकरांना विनाअडथळा वाहतूक सेवा देण्यासाठी ‘बेस्ट’ उपक्रमाच्या ताफ्यात स्वमालकीच्या किमान ३, ३३७ बस आवश्यक आहेत. मात्र, ‘बेस्ट’कडे स्वमालकीच्या १,०७८ बस शिल्लक आहेत.

 नव्या गाड्यांची वेळेत खरेदी केली नाही तर ‘बेस्ट’ सेवा डिसेंबर २०२५ नंतर संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे मुंबईकरांच्या साथीने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. ‘बेस्ट’ बस सेवेबाबत जनजागृती करणारे फलक आणि आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत.

 कुर्ला येथील ‘शिवशक्ती मित्र मंडळा’तर्फे बेस्ट बचाव अभियानाचा आकर्षक देखावा साकारला आहे. शिवाय, कुर्ला येथील क्रांतिनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बैल बाजार येथील सर्वोदय मित्र मंडळ, कुर्ला येथील तानाजी मित्र मंडळ, बजरंग सेवा संघ, कोपरखैरणे येथील एकदंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माटुंगा येथील प्रगती नगर गणेशोत्सव मंडळ यांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक मंडळांनी बेस्ट बचाव अभियानाचे फलक मंडपात उभारले आहेत.

२०१९ पासून निधीच नाही-

१) ‘बेस्ट’ प्रशासनाने २०१८ सालानंतर एकही स्वमालकीची बस खरेदी केलेली नाही. सर्व बस आणि कामगार कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले आहेत. 

२) नव्या गाड्या खरेदीसाठी महापालिकेने बेस्ट उपक्रमाला निधी पुरविणे आवश्यक आहे.

३) मात्र, पालिकेने २०१९ पासून ‘बेस्ट’ उपक्रमाला नव्या गाड्यांच्या खरेदीसाठी एकदाही निधी दिलेला नाही. 

४) या पुढेदेखील ही स्थिती कायम राहिल्यास मार्च २०२५ मध्ये बेस्ट उपक्रमाकडे स्वमालकीच्या ७७५, तर नोव्हेंबर २०२५ मध्ये ५५१ (८ टक्के) गाड्या शिल्लक राहतील, अशी भीती कामगार नेते शशांक राव यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: in mumbai slogan of best bachao in ganeshotsav public awareness campaigns by boards regarding public transport system 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.