Join us  

पापड, बूट, शरीरातून सोने, परदेशी चलनाची तस्करी; विमानतळावर २० किलो सोने, गांजा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 9:49 AM

मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने १५ ते २७ जुलैदरम्यान ही कारवाई केली आहे.

मुंबई : सीमा शुल्क विभागाने गेल्या दोन आठवड्यांत मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या ३९ कारवायांमध्ये १३.११ कोटी रुपयांचे २० किलो सोने, ४.९८ किलो गांजा आणि कोट्यवधींचे परदेशी चलन जप्त केले आहे. तस्करांनी सोन्याची पूड शरीरात लपविण्याबरोबर बूट, पुठ्ठ्यांची पेटी, कागदाचे थर, पापड आणि जिन्स पँटमधून गांजा आणि परदेशी चलनाची तस्करी केल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने १५ ते २७ जुलैदरम्यान ही कारवाई केली आहे. दिल्लीतील वसंत विहार येथील रहिवासी असलेल्या एक भारतीय नागरिक पुठ्ठ्यातून गांजाची तस्करी करत असल्याचे सीमा शुल्क विभागाला आढळून आले. दुबई येथून प्रवास करणारे दोन भारतीय, तर जेद्दाह येथून एक, शारजाह येथून एक,कोलकाता येथून एक आणि अहमदाबाद येथून प्रवास करणारा एक, अशा सहा भारतीय नागरिकांना सोने तस्करीप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून २४ कॅरेट सोन्याची पूड, बार आणि वायर जप्त केले आहे. दुबई येथून तीन आणि कोलंबो येथून आलेल्या एका परदेशी नागरिकाच्या खिशातून आणि ट्रॉलीत लपवून ठेवलेले सोने जप्त केले. 

विमानातील सीटखाली आढळले सोने-

१) दुबईतून १२, बहरीन आणि दोहा येथून प्रत्येकी दोन, हाँगकाँग, शारजाह, सिंगापूर, बँकॉक, अबूधाबी आणि जेद्दाह येथून आलेल्या प्रत्येकी एका, अशा एकूण २२ भारतीयांकडूनही ३० महागडे फोन, ४४ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

२)  चप्पलच्या तळव्यात कागदाच्या दोन थरांमध्ये, दोन गेमिंग कन्सोलच्या मदरबोर्डच्या खाली, सामान वाहून नेणाऱ्या ट्रॉलीच्या पुढील चाकाजवळ आणि शरीरावर त्यांनी ऐवज लपवून ठेवल्याचे आढळून आहे. तर, आणखी एका कारवाईत विमानातील सीटच्या पोकळ पाइप आणि सीटच्या खाली जवळपास दोन कोटी ७० लाख ४७ हजार रुपयांचे सोने आढळून आले.

पापडामध्ये परदेशी चलन-

सिंगापूर, अबुधाबी आणि बँकॉक येथे प्रवास करणाऱ्या आठ भारतीयांकडून ९६ लाख ४१ हजार रुपयांचे परदेशी चलन जप्त केले. या आरोपींना अटक केली असून, त्यांनी पापडांच्या थरामध्ये हे पैसे लपवले होते.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसविमानतळ