Join us  

बनियान, ट्राउझर्सच्या पट्ट्यांतून चक्क सोने अन् हिऱ्यांची तस्करी ! तीन कोटींचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 9:34 AM

बनियान, ट्राउझर्सच्या पट्टयातून सोने आणि हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या तीन प्रवाशांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बनियान, ट्राउझर्सच्या पट्टयातून सोने आणि हिऱ्यांची तस्करी करणाऱ्या तीन प्रवाशांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत एकूण तीन कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २० आणि २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री केलेल्या कारवाईत एक कोटी ५८ लाख रुपयांचे २.२८६ किलो सोने आणि एक कोटी ५४ लाख किमतीचे हिरे जप्त करण्यात आले आहेत.

दुबईहून मुंबईला आलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्याची झाडाझडती घेत त्याच्याकडून २४ कॅरेट सोन्याचे १२ बार जप्त करण्यात आले. त्याने ट्राउझर्सच्या पट्टयांजवळच्या पोकळीत या सोन्याचे बार लपवून ठेवले होते. अधिक चौकशीत, त्याच विमानातील दुसऱ्या प्रवाशाच्या सांगण्यावरून तस्करी केल्याचे सांगताच सहप्रवाशालाही अटक करण्यात आली. तर, दुसऱ्या प्रकरणात, हाँगकाँगहून मुंबईला आलेल्या एका प्रवाशाने घातलेल्या बनियानच्या चोर कप्प्यातून दीड कोटींचे हिरे आढळले. त्यानुसार त्याला अटक केली. याप्रकरणी तिघांची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस