मुंबई :मुंबईविमानतळाच्या पार्किंग परिसरात गुरुवारी चक्क एक साप आढळून आल्याने तेथील कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये मोठ्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यावेळी तिथे उपस्थित एका व्यक्तीने हा साप फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर तोही खूप व्हायरल झाला.
मुंबईत विमानतळावरील पार्किंग परिसरात एका वाहनावर चार ते पाच फूट लांबीचा साप चढताना एका व्यक्तीला दिसला. त्याने इतरांना तो साप दाखवल्यानंतर तेथे उपस्थित लोकांमध्ये भीती निर्माण झाली. आता नेमके करायचे काय, या चिंतेने काही प्रवाशांची सुरक्षित स्थान शोधण्यासाठी पळापळदेखील झाली. त्यातून काही काळ येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर तातडीने वन विभागाशी संपर्क साधत अधिकाऱ्यांना तेथे बोलावण्यात आले. या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या सापाला पकडल्यानंतर अखेर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. वन विभागाने या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. दरम्यान, कुणीही जखमी झालेले नसल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.