Join us  

पालिकेच्या ४ मार्केटमध्ये सौरऊर्जेचा प्रकाश; वीज बिलामध्ये मोठी बचत शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 10:29 AM

मुंबई महापालिकेने टप्प्याटप्प्यात आपल्या चार मार्केटच्या छतांवर सौर पॅनेल बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने टप्प्याटप्प्यात आपल्या चार मार्केटच्या छतांवर सौर पॅनेल बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्केटमध्ये सौर ऊर्जा वापरली जाणार असल्याने पालिकेच्या विजेच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. 

पालिकेच्या अखत्यारीत ९२ किरकोळ मंड्या व समायोजन आरक्षण अंतर्गत प्राप्त झालेल्या १०८ मंड्या आहेत. त्याशिवाय १६ खासगी मंड्या असून, तेथे मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विजेचे बिल येत आहे. त्यात बचत करण्यासाठी पालिका प्रशासनाने मार्केटवर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्याची  योजना आखली आहे. 

पहिल्या टप्प्यात पालिकेच्या डॉकयार्ड रोड, बाबू गेनू मार्केट, परळ येथील डॉ. शिरोडकर मार्केट आणि महात्मा ज्योतिबा फुले मार्केट (क्रॉफर्ड मार्केट) च्या छतावर प्रत्येकी २५  किलोवॉट सौर पॅनेल बसविण्यात येणार आहे. त्याद्वारे मार्केटमधील गाळेधारकांना वीजपुरवठा केला जाणार आहे. गाळेधारकांकडून वीज बिलही घेण्यात येणार आहे. मात्र, हे बिल सध्याच्या वीज बिलापेक्षा कमी असेल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य मार्केटमध्ये सौर पॅनल बसवण्यात येणार आहे.

‘सीएफएल’ऐवजी ‘एलईडी’ दिवे-

मार्केटमधील सीएफएल दिवे बदलून त्याऐवजी एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. ट्रान्झिट कॅम्प, बाबू गेनू मार्केट, महात्मा ज्योतिबा फुले मार्केट, गोवंडी येथील  लक्ष्मण बाबू मोरे म्युनिसिपल मार्केट आणि बी. एच. चेंबूरकर मार्केटचा पुनर्विकास झाल्यानंतर तेथे सौर ऊर्जेवरील दिवे बसवण्यात येणार आहेत.

टॅग्स :मुंबईनगर पालिकासूर्यग्रहण