Join us

कोणी आपले हातपाय गमावले, तर कोणी जीव; लाइक्स, शेअरसाठी तरुणांकडून होतेय स्टंटबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:27 AM

वाहनाला खेळणे समजून स्टंटबाजी करण्याचे प्रकार मुंबईत दिवसेंदिवस वाढत आहेत.

मुंबई : वाहनाला खेळणे समजून स्टंटबाजी करण्याचे प्रकार मुंबईत दिवसेंदिवस वाढत आहेत. तर, काही तरुण मंडळी लाइक, शेअरिंग आणि जास्तीत जास्त आपले व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी जीवघेणे स्टंट करत रील्स बनवताना दिसतात. मात्र, अशी स्टंटबाजी त्यांच्या जीवावर बेतत असल्याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. अशा प्रकारांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर, काहींनी हातपायही गमावले आहेत. 

पूर्वी स्वतःला सिद्ध करण्यासाठी साहसी खेळ खेळले जात होते. सद्य:स्थितीत सोशल मीडियाच्या वाढत्या जाळ्यात फक्त प्रसिद्धीसाठी असे प्रकार होतात. सध्याची तरुणाई सोशल मीडियालाच आपले जग समजत आहे. त्यात पुढे राहणे म्हणजे, यशाचा टप्पा गाठणे असा त्यांचा समज झाला आहे. परिणामी जीवनात मेहनत करून, अभ्यास करून यशाचे शिखर गाठण्याऐवजी वेगळे काही तरी करण्यासाठी ते स्टंटबाजीचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताना दिसतात. त्यालाही लाइक्स कमी मिळाले तर आणखी धाडसी खेळ करून त्याचे व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. 

‘तरुणांची मानसिकता बदला’-

१) जीवघेणी स्टंटबाजी करताना आपण आपल्या व्हिडीओला किती लाइक्स मिळाले हे पाहण्यासाठी जिवंत राहू का, याचा विचार त्यांनी करणे आवश्यक आहे. 

२) तरुणांना अशा प्रकारांपासून रोखण्यासाठी पालकांनी त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. 

३) बालपणातच त्यांना चांगल्या, वाईट गोष्टी पटवून द्याव्यात, असा मोलाचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

अन् हात, पाय गमावले-

१) लोकलला लटकून स्टंट करायचे आणि त्याचे रील करण्याची मस्ती वडाळा येथील रहिवासी असलेल्या फरहत आझम शेख या तरुणाला भलतीच महागात पडली आहे. 

२) या नादात त्याला हात आणि पाय गमवावा लागला आहे. 

३) याआधीही असाच स्टंट करताना पोलिसांनी त्याला पकडले होते. त्यावेळी समज देत त्याला सोडण्यात आले होते.

४) शिवडी स्थानकावर स्टंटबाजी करतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर १४ जुलैला व्हायरल झाला होता. 

५) पोलिसांनी त्याचा शोध घेताच १४ जुलैलाच मशीद बंदर स्थानकावर स्टंट करताना झालेल्या अपघातात फरहतने डावा हात आणि पाय गमावल्याचे समोर आले. 

६) अखेर, अपघातानंतर कोणी असे स्टंट करू नये, असे आवाहन करताना तो दिसून आला. 

टॅग्स :मुंबईसोशल मीडियासोशल व्हायरल