Join us

महापालिकेकडून गोठ्यांना लवकरच नोटिसा; मुंबई बाहेर स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 11:21 AM

मुंबईतील विविध भागांत असलेले गायी-म्हशींचे गोठे डहाणू तालुक्यातील दापचरी येथे स्थलांतरित करण्याचा जवळपास १७ वर्षांपासूनचा प्रश्न अखेर सुटण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुंबईतील विविध भागांत असलेले गायी-म्हशींचे गोठे डहाणू तालुक्यातील दापचरी येथे स्थलांतरित करण्याचा जवळपास १७ वर्षांपासूनचा प्रश्न अखेर सुटण्याची शक्यता आहे. मुंबईत एकूण २५० हून अधिक गोठे असून ते हटवण्यासाठी राज्य सरकारच्या पशुसंर्वधन आणि दुग्धव्यवसाय विभागाने पालिका प्रशासनाकडे मदत मागितली आहे. त्यानुसार पालिकेने या गोठ्यांना नोटीस बजावण्याचे ठरवले असून त्यासाठी नोटिशीचा मसुदा मुंबई महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.   

मुंबईतील विविध भागांत असलेल्या जवळपास १० हजार गुरांच्या गोठ्यांमुळे प्रदूषणाचा आणि पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे, असे निदर्शनास आणणारी रिट याचिका ‘जनहित मंच’ने २००५ मध्ये केली होती. त्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने या याचिकेचे जनहित याचिकेत रूपांतर करून गोठे मुंबईबाहेर हलवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर २६ जुलै २००५ मध्ये मुंबई महापूर आला आणि यामध्ये विविध ठिकाणी असलेल्या गोठ्यांतील शेकडो गाई-म्हशी बुडून मृत पावल्या होत्या. हे गोठे शहराबाहेर हलविण्याची मागणी अधिक जोर धरू लागली. दरम्यान, आता राज्य सरकारनेही मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार करून आमच्या अखत्यारीतील जागांवरील गोठे हटविणे शक्य नसून, महापालिकेने त्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केल्याची माहिती पुढे आली आहे.

जनावरांचा मुंबईकरांना त्रास- गोठ्यांतील शेण, मलमूत्र रेल्वे रुळांजवळ किंवा नदी-नाल्यात सोडले जात असल्याची तक्रार अनेकदा केली जाते. तसेच जनावरे अन्नाच्या शोधात शहरातून फिरत असतात. त्यामुळे शहरात वाहतूककोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अंधेरीच्या गोखले पुलावरही गायी नेणाऱ्यांमुळे वाहतूककोंडी होत असल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या होत्या. मोकाट फिरणारी जनावरे कचऱ्याच्या पेट्यांमध्ये तोंड घालत असल्यामुळे कचरा इतरत्र पडतो, अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने पालिकेकडे येत असतात.

टॅग्स :मुंबईनगर पालिकादूध