Join us

अकरावी प्रवेशाची आज विशेष फेरी; प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांत धाकधूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 9:44 AM

इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिली विशेष प्रवेश यादी आज सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.

मुंबई: इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिली विशेष प्रवेश यादी सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेले तसेच सुरुवातीच्या तिन्ही नियमित फेऱ्यांमध्ये प्रतिबंधित झालेले सर्व विद्यार्थी या विशेष फेरीत सहभागी होऊ शकणार आहेत.

विशेष फेरीपासून पुढे कोणत्याही विद्यार्थ्यास प्रतिबंधित केले जाणार नाही. त्यामुळे तिसऱ्या फेरी प्रमाणेच या फेरीचा कट ऑफ ही वाढणार की कमी होणार, याकडे आता पालकांचे व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

यंदा अकरावी प्रवेशासाठी कोट्यासह एकूण चार लाख एक हजार ८९५ जागा उपलब्ध असून, त्यातील पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये एक लाख ४२ हजार ५९१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अद्यापही प्रवेशाच्या दोन लाख ५९ हजार ३०४ जागा रिक्त आहेत. दरम्यान, तिसऱ्या फेरीत नामवंत महाविद्यालयांचा कट ऑफ वाढल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम बदलण्याकडे कल दर्शविला आहे. 

१) महाविद्यालयांची संख्या- १०४६

२) प्रवेश क्षमता- ४,०१,८९५

३) प्रवेश निश्चिती- १,४२,५९१  

४) रिक्त जागा- २,५९,३०४

५) प्रवेश (टक्क्यांमध्ये)- ३५.४८

विद्यार्थ्यांचा तांत्रिक अभ्यासक्रमांकडे कल-

१) विद्यार्थ्यांचा कल व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे अधिक आहे. दहावीनंतर विविध अल्पकालीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

२) तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमालाही विद्यार्थी प्राधान्य देतात. तंत्रनिकेतन पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो.

३) विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्येही विविध अभ्यासक्रम आहेत. त्यामुळे अकरावीसाठी अनेक विद्यार्थी प्रवेश निश्चित करत नाहीत.

टॅग्स :मुंबईमहाविद्यालयविद्यार्थी