Join us

महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग; आयुक्तांनी अचानक भेट देत केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 9:51 AM

न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग आला आहे.

मुंबई : न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेच्या 'फेरीवाला हटाव मोहिमे'ला वेग आला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर काही दिवसांपासून कारवाई सुरू झाली आहे. विशेषतः वर्दळीच्या व अधिक गर्दीच्या रेल्वे स्थानक परिसरांमध्ये विशेष लक्ष केंद्रीत करून अनधिकृत फेरीवाले हटविण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दादर पश्चिम परिसरात मोहीम सुरू असून सोमवारी महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या परिसराला अचानक भेट देऊन पाहणी केली.

फेरीवाले तसेच इतर अतिक्रमणे यामुळे पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. पालिकेच्यावतीने अनधिकृत फेरीवाले व पदपथांवरील अतिक्रमणे यावर केली जाणारी कारवाई अधिक तीव्र करण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईला वेग द्यावा, वर्दळीच्या परिसरांमध्ये अधिक नियोजनपूर्वक व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करावी, रस्त्यांच्या कडेची बेवारस वाहने हटवावीत, असे निर्देश गगराणी यांनी सर्व संबंधित विभागांना दिले होते. याअनुषंगाने काही दिवसांपूर्वी पालिका मुख्यालयात पोलिस प्रशासनासमवेत बैठकही देखील पार पडली होती. त्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत ठिकठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई अधिक तीव्रतेने राबविण्यात येत आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाई सुरू ठेवावी. विजेच्या अनधिकृत जोडण्या आढळून येताच त्या तातडीने खंडित कराव्यात. रेल्वे स्थानक परिसरातील कचरा निर्मूलन प्रभावीपणे करून परिसर स्वच्छ ठेवा. दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सोपे व्हावे, यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या वाहनांच्या तुलनेत लहान आकाराची अतिक्रमण निर्मूलन वाहने उपलब्ध करून घ्या. 

या परिसराची आयुक्तांकडून पाहणी-

१) अत्यंत वर्दळीचा परिसर म्हणून दादरची ओळख आहे. या ठिकाणची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी गगराणी यांनी आज भेट देऊन पाहणी केली.

 २) दादर (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसरातील सेनापती बापट मार्ग, केशवसूत उड्डाणपुलाखालून ये-जा करण्यासाठी असणारे प्रवाशी मार्ग / गाळे, तसेच संलग्न असणारे एम. सी. जावळे मार्ग, डॉ. डिसिल्वा मार्ग, रानडे मार्ग आदी सर्व परिसरांमध्ये पायी फिरून आयुक्तांनी पाहणी केली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाफेरीवालेदादर स्थानक