Join us

काँक्रीटच्या रस्त्यांचा दर्जा काटेकोरपणे तपासा; आयुक्तांच्या ‘आयआयटी’ला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 10:46 AM

मुंबईतील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची (सीसी) कामे प्रगतिपथावर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईतील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची (सीसी) कामे प्रगतिपथावर आहेत. देशातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून रस्त्यांच्या कामांना वेग द्यावा, अशा सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधितांना दिल्या आहेत. त्याचबरोबर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा, गुणवत्ता तपासण्यासाठी त्रयस्थ संस्था म्हणून नेमलेल्या मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) कामाची गुणवत्ता काटेकोरपणे करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर, अशा एकूण ७०१ किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. त्यात शहर विभाग, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील रस्ते कामांचा समावेश आहे. 

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील ५ पॅकेज (शहर विभाग १, पूर्व विभाग १ आणि पश्चिम विभाग ३) आणि पहिल्या टप्प्यातील १ पॅकेजच्या कामांची गुणवत्ता तपासणी व त्यादृष्टीने कामे ‘आयआयटी’तर्फे केली जाणार आहेत. 

रस्त्यांच्या कामाची पाहणी करून त्याची निरीक्षणे नोंदविणे आणि त्यावरील सल्ला याबाबत वेळोवेळी अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांकडून तपशील घेतला जाईल. तसेच काँक्रिट प्लांटमध्ये मटेरियल बनविण्याच्या टप्प्यापासून ते काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच्या विविध चाचण्यांद्वारे आयआयटीकडून तपासणी केली जाईल. त्यात क्युब टेस्ट, कोअर टेस्ट, स्लम्प कोन टेस्ट, ड्युरॅबिलिटी टेस्ट, फिल्ड डेन्सिटी टेस्ट आदी विविध तांत्रिक चाचण्यांचा समावेश आहे. कामाचा दर्जा, गुणवत्ता यांच्यात हयगय कदापि खपवून घेतली जाणार नाही. - अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

कामांच्या अंमलबजावणीसाठी समन्वय-

रस्त्यांच्या कामात प्राधान्यक्रम निश्चित केल्यापासून कामाची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर पालिकेचे अभियंते व आयआयटी टीम यांच्यात योग्य समन्वयासाठी पालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी बैठक झाली. त्यात आयआयटीचे प्रा. के. व्ही. के. राव यांनी कामकाजाची दिशा कशी राहील, हे स्पष्ट केले व त्यासाठी रस्ते विभागाने आवश्यक माहिती पुरविणे, प्राधान्यक्रमांची यादी पुरविणे, कामे सुरू असताना सामग्री (मटेरियल) बनविण्याचा कारखाना ते प्रत्यक्ष कार्यस्थळ या ठिकाणी वेगवेगळ्या चाचण्या, आयआयटी चमूच्या नियोजित भेटी यांसाठी परिवहन (लॉजिस्टिक) साहाय्य तसेच आयआयटी टीमला कार्यस्थळी विनासायास प्रवेश मिळावा यासाठीची सुलभता अशा विविध बाबींबाबत रस्ते विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. दरम्यान, आयआयटी आणि रस्ते विभाग यांच्यातील समन्वयासाठी समन्वय (नोडल) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाआयआयटी मुंबईरस्ते वाहतूक