मुंबई : लोकप्रिय 'मल्हार' फेस्ट हा सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या महत्वाच्या कल्चरल इव्हेंटपैकी एक आहे. सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा भव्य 'मल्हार' फेस्ट अखेर संपन्न झाला आहे. जवळपास दोन दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कलाविष्कार विद्यार्थ्यांना अनुभवता आले. गेल्या ४५ वर्षापासून चालत आलेली ही अविरत परंपरा अजूनही कायम आहे.'विवा ला विदा' या संकल्पनेवर आधारित हा भव्य फेस्ट आयोजित करण्यात आला होता. 'विवा ला विदा' याचा अर्थ 'आयुष्य मनमोकळेपणाने जगा' असा आहे. 'मल्हार' फेस्टच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. मुंबईतील वेगवेगळ्या महाविद्यालयांना याचं आमंत्रणही देण्यात येतं. 'मल्हार'च्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो. यंदाही लोकप्रिय 'मल्हार' फेस्टला तरुणाईचा उत्सत्फूर्त प्रतिसाद मिळाला. सालाबादप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्यांनी 'मल्हार' फेस्टला प्रचंड गर्दी केली. शिवाय या तरुणाईचा उत्साह काही औरच होता. सेंट झेवियर्सच्या विद्यार्थ्यांसह या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री श्रिया पिळगांवकर, इम्रान खान तसेच अनिता श्रॉफ यांसारख्या कलाकार मंडळींनी 'मल्हार' फेस्टला हजेरी लावली.
जागरण, गोंधळ आणि भांगडा नृत्याचे सादरीकरण-
गेल्या दोन दिवसांपासून सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या आवारात विविध कार्यकमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 'मल्हारी' इव्हेंट हा सर्वाधिक लक्षवेधी ठरला. शिवाय या मल्हारी इव्हेंटने विद्यार्थ्यांच्या उत्साहात देखील भर घातली. यामध्ये भारताच्या वैविध्यपूर्ण जीवनशैलीचं दर्शन घडवण्यात आलं. सोबतच 'मल्हार' फेस्टमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.'फोर्ज अ फॅक्ट'मध्ये विद्यार्थांनी चित्रपटातील एक सीन रिक्रिएट करून चालू घडामोडींवर भाष्य करणारं नाटक सादर करण्याची थीम होती. 'ड्रामा के आगे डर' या नावातच सगळं आलं. यामध्ये एखादा हॉरर सीनचं सादरीकरण करण्याचा टास्क होता.'मोसाईक मोंटाज', 'इम्प्रुव्हने बना दी जोडी' या कॉम्पिटीशन्समध्येही विद्यार्थांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
'मल्हार अराउंड द वर्ल्ड'-
'मल्हार अराउंड द वर्ल्ड' यामध्ये पाश्चिमात्य देशातील वेशभूषा किंवा तेथील प्रथा परंपरा दाखवणारा हा एक फॅशन शोचा इव्हेंट होता. साऊथ आफ्रिका, मेक्सिको तसेच जपान यांसारख्या देशांतील लोकांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी वेगवेगळं सादरीकरण केलं.यातून तेथील सद्यस्थितीवर भाष्य करणारं नाटक देखील सादर करायचं होतं. बॉलिवूड अभिनेत्री श्वेता त्रिपाठी तसेच बरखा सिंग या यांनी कार्यक्रमाच्या परीक्षक पदाची धुरा सांभाळली.
विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेना -
मल्हार फेस्टिव्हला विद्यार्थ्यांची धमाल,मजा-मस्ती पाहायला मिळाली. शिवाय या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर मनोरंजन विश्वातील कलाकारांनी आपल्या उपस्थितीने मल्हार फेस्टला चार चाँद लावले. हा फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक मनोरंजनाची पर्वणीच घेऊन आला होता.