अभियांत्रिकी कॉलेजसाठी ‘कॅप फेरी’ला सुरुवात; पहिली गुणवत्ता यादी २ ऑगस्टला जाहीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:30 AM2024-07-16T11:30:23+5:302024-07-16T11:33:26+5:30
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅप प्रवेश प्रक्रियेला रविवारपासून सुरुवात झाली आहे.
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॅप प्रवेश प्रक्रियेला रविवारपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. पहिली गुणवत्ता यादी २ ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे, असे सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली होती. अखेर सीईटी सेलने कॅप प्रवेश प्रक्रियेला रविवारपासून सुरुवात केली आहे. त्यातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. सीईटी सेलकडून २७ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. यंदा ४ लाख १० हजार विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली पीसीएम ग्रुपच्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख ७९ हजार ८०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात सीईटी सेलने जाहीर केला होता. गेल्यावर्षी ३ लाख १३ हजार विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा दिली होती. त्या तुलनेत यंदा सीईटी परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
दहा दिवसच शिल्लक-
१) कॅप फेरीसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून १००० रुपये, तर अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून ८०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
२) परदेशी विद्यार्थ्यांना १० हजार रुपये शुल्क भरावे लागेल. आता प्रवेशासाठी अर्ज करण्यास दहा दिवसच उरले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे.
असे असेल प्रवेशाचे वेळापत्रक-
१) सीईटी सेलकडून १४ जुलैपासून प्रवेशासाठी नोंदणीला सुरुवात होणार.
२) विद्यार्थ्यांना कॉलेजचे पसंतीक्रम २४ जुलैपर्यंत नोंदविता येतील.
३) २७ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार.
४) २८ ते ३० जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना हरकती नोंदविता येतील.