मालाड रेल्वे स्थानकावर लवकरच स्टीलचा फलाट; विरारच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 09:29 AM2024-09-20T09:29:04+5:302024-09-20T09:31:30+5:30
मालाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-१ वर बदल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मालाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-१ वर बदल केला आहे. यामुळे विरारच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना डाव्याऐवजी उजव्या बाजूला चढावे आणि उतरावे लागते. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने या स्थानकावर नवीन तात्पुरते स्टीलचे फलाट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरारच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मालाड स्थानकात दोन्ही दिशेने उतरता येणार आहे. मालाड स्थानकावर दररोज सव्वा लाख प्रवाशांची ये-जा असते.
गोरेगाव ते कांदिवली रेल्वे स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे नवीन बेट फलाट तयार झाले आहे. मालाड स्थानकात चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी फलाटांमध्ये काही बदल केले आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही समस्या कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे काही योजना राबवत आहे. यामध्ये नवीन तात्पुरते फलाट बांधणे, लोकल थांबण्याच्या ठिकाणांमध्ये फेरबदलाचा समावेश आहे.
तात्पुरत्या फलाट उभारणीस मंजुरी -
पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत मालाड स्थानकात तात्पुरते फलाट उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत स्टीलचे फलाट उभारण्यात येणार आहे.
१) प्रवाशांना फलाटाच्या दोन्ही बाजूला उतरता येणार आहे.
२) अप आणि डाऊन दिशेला जाणाऱ्या गाड्या एकाचवेळी समोरासमोर थांबल्यावर स्थानकात प्रवाशांची गर्दी होत होती.
३) परिणामी प्रवाशांना फूट ओव्हर ब्रीज आणि इतर सुविधांपर्यंत पोहोचण्यासाठी त्रास होत होता.
४) रेल्वेच्या नव्या योजनेनुसार आता या ट्रेन सध्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर थांबणार आहेत.
५) वेळापत्रकात काही बदलही करण्यात येणार आहेत. ज्यामुळे फलाटावर होणारी गर्दी टाळता येईल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.