मुंबई : सार्वजनिक रुग्णालयांच्या परिसरात श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. श्वानांमुळे रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाइकांना रुग्णालयात प्रवेश मिळविण्यासाठी अनेकदा सुरक्षा रक्षकांबरोबर वाद घालावा लागतो. सार्वजनिक रुग्णालयांच्या ठिकाणी भटक्या श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे महापालिका आणि शासनाच्या रुग्णालय परिसरातून अनेकदा या श्वानांना गाडीतून नेले जाते, मात्र पुन्हा काही दिवसांनी ते परत येतात, असे चित्र पाहायला मिळत आहे.
या भटक्या श्वानांचा वावर रुग्णालय परिसर तसेच वॉर्डच्या बाहेरसुद्धा असतो. सुरक्षा रक्षक त्यांना हाकलून देतात, पण परत ते माघारी येतात. रुग्णालय प्रशासन, संबंधित वॉर्डमध्ये या श्वानांच्या उच्छादाबद्दल अनेक तक्रारी येतात. मात्र त्याच्यावर योग्य उपाययोजना केल्याचे आढळून येत नाही.
भटक्या श्वानांच्या सुळसुळाटाचा त्रास रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांनासुद्धा होता. यासंबंधी अनेकदा नागरिक तक्रार करतात. आम्हीही आमच्या वॉर्डमध्ये तक्रार देतो. केव्हा तरी ते श्वान पकडणारी गाडी येते आणि त्यांना घेऊन जाते. दोन दिवस शांततेत गेले की श्वान पुन्हा परत येतात.
रात्रीच्या वेळी या श्वानांची भीती वाटते, असे पालिकेतील एका वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरने सांगितले.
आम्ही सुरक्षा रक्षकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी विशेष परिपत्रक काढून सर्व रुग्णालयांना पाठविले आहे. सुरक्षा विभागालासुद्धा याबाबत कळविण्यात आले आहे. - डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त आरोग्य
श्वानप्रेमींकडून बिस्कीट, दूध-
१) रुग्णालयांच्या परिसरात अस्वच्छता असल्यामुळे या श्वानांची संख्या वाढली आहे. त्यांना या परिसरात खाण्यास मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात राबता असतो, असे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले, तर काही श्वानप्रेमी बिस्कीट, दूध, तत्सम खाद्यपदार्थ त्यांना खाण्यासाठी देतात.