Join us  

पथविक्रेता निवडणूक; २३७ उमेदवार रिंगणात, २९ ऑगस्ट रोजी होणार मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 10:54 AM

महापालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची एक शिखर समिती आणि सात परिमंडळांच्या प्रत्येकी एक, अशा एकूण आठ समित्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची एक शिखर समिती आणि सात परिमंडळांच्या प्रत्येकी एक, अशा एकूण आठ समित्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक लढवण्यास पात्र असलेल्या २३७ उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यातील अंतिम २३७ उमेदवारांपैकी १९० पुरुष, तर ४७ महिला उमेदवार आहेत.

या निवडणुकीत शिखर समितीसह सातही परिमंडळांच्या मिळून एकूण ६४ जागांपैकी १० जागांवर एकही उमेदवार नाही. तर, १७ जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्यामुळे या १७ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. केंद्राच्या पथविक्रेता अधिनियमानुसार नगर पथविक्रेता समिती स्थापन करण्यात येत आहे.

पथविक्रेता शिखर समितीसाठी ३३ अर्ज वैध ठरले आहेत. त्यात अनुसूचित जाती- ३, इतर मागासवर्ग- ४, अल्पसंख्याक (महिला राखीव)- २, दिव्यांग (महिला राखीव) - २, सर्वसाधारण गट - १९, सर्वसाधारण गट (महिला राखीव)- ३ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती या प्रवर्गाकरिता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे ही जागा तूर्त रिक्त राहणार आहे.  

३२ हजार ४१५ मतदार, मतदानासाठी ६७ केंद्र महापालिका कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत नगर पथविक्रेता मतदारांची एकूण संख्या ३२ हजार ४१५ आहे. त्यामध्ये परिमंडळ-१ मधील ७ हजार ६८६, परिमंडळ-२ मधील ५ हजार ३०३, परिमंडळ-३ मधील ४ हजार ६६८, परिमंडळ-४ मधील ७ हजार ५०१, परिमंडळ-५ मधील २ हजार १६०, परिमंडळ-६ मधील ३ हजार ०३३, परिमंडळ-७ मधील २ हजार ०६४ मतदारांचा समावेश आहे.

वॉर्ड स्तरावर केंद्र-

पथविक्रेता समित्यांच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानासाठी प्रत्येक वॉर्ड स्तरावर मतदान केंद्र असतील. या निवडणुकीसाठी ६७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. पथविक्रेत्यांची निवडणूक घेण्यासाठी अंतिम केलेली नोंदणीकृत पथविक्रेता मतदार यादी ही पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकानिवडणूक 2024