मुंबई : मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण योजने'तील लाभार्थ्यांची माहिती आणि कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करण्याचे काम पालिका शिक्षिका आणि अंगणवाडी सेविकांना देण्यात आल्याने शिक्षकांसह अंगणवाडी सेविकांवर कामाचा ताण वाढला आहे. या अतिरिक्त कामामुळे मूळ शैक्षणिक कामात मोठा अडथळा येत असल्याचा नाराजीचा सूर शिक्षिका व अंगणवाडी सेविकांमध्ये उमटत आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हे फॉर्म अपलोड करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुळात अंगणवाडी सेविकांना मासिक १० हजार, तर मदतनिसांना मासिक ५ हजार २०० इतके वेतन मिळते. त्यांना वेगळा प्रवासभत्ता मिळत नाही. योजनेसाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांना आपल्या वेतनातूनच भागवावा लागत आहे. सरकारने अपलोड होणाऱ्या प्रत्येक फॉर्मसाठी ५० रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही रक्कम भरलेला अर्ज मंजूर होऊन अर्जदाराच्या खात्यामध्ये योजनेची रक्कम जमा झाल्यानंतर मिळणार आहेत. त्यातच सध्या वेबसाइटच नीट चालत नसल्याने दिवसभरात फक्त एक किंवा दोन फॉर्म अपलोड होत आहेत, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी सांगितले.
...तर लवकरच मोर्चा
सर्व कागदपत्रे स्कॅन करून फॉर्म सबमिट करणे खूप वेळखाऊ ठरते आहे. त्यामुळे हे फॉर्म ऑफलाइन जमा करून घेतले जावे, अशी विनंतीही अंगणवाडी सेविकांनी सरकारकडे केली आहे. सरकारने याकडे लक्ष न दिल्यास निषेध मोर्चा काढू, असा इशाराही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने दिला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व काम नारीशक्ती ॲपमधून करावे लागते. पण सतत सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे फॉर्म आणि कागदपत्रे अपलोड होण्यासाठी तासन् तास वाट पाहावी लागते. मुलांना पोषण आहार देणे, बालक व महिलांच्या आरोग्याबाबत सर्व्हेचे काम करणे यासह इतर आरोग्य आणि शिक्षणासंदर्भात आवश्यक सेवांवर परिणाम होत आहे. - संगीता कांबळे, राज्य कार्याध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी संघटना