Join us  

सफाई कामगारांचे वेतन थकल्याने कामबंद आंदोलन; पोर्ट ट्रस्ट वसाहतीमध्ये कचऱ्याचे ढीग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 11:56 AM

साफसफाईचे काम करणारे कंत्राटी कामगार तीन महिन्यांच्या वेतन थकबाकीसाठी १ जुलैपासून संपावर आहेत.

मुंबई :मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वैद्यकीय खात्याच्या अधिपत्याखाली  साफसफाईचे काम करणारे कंत्राटी कामगार तीन महिन्यांच्या वेतन थकबाकीसाठी १ जुलैपासून संपावर आहेत. कंत्राटदाराने या कामगारांना वेतन न  दिल्यामुळे सफाई कामगारांनी काम बंद केले आहे. संपामुळे  पोर्ट ट्रस्ट वसाहतीमधून कचऱ्याचे ढीग वाढत चालले असून पावसाळा असल्यामुळे रोगराई पसरण्याची मोठी  भीती आहे.

वैद्यकीय खात्यातील साफसफाईचे कामगार बहुसंख्येने निवृत्त झाल्यामुळे या खात्याच्या अधिपत्याखाली  साफसफाई करण्यासाठी केएचएफएम हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड या ठेकेदाराला कंत्राट दिले आहे. पूर्वी हे काम  सुमित ठेकेदार करत होता. कंत्राटदारामार्फत कामगार तेजस नगर,  सद्भावना, गिरीनगर, वडाळा जुनी वसाहत, झकेरीया बंदर, माझगाव डॉक कॉलनी,  वरळी कॉलनी, पॅन्टन बंदर या वसाहतीमध्ये साफसफाईचे काम करतात.

कंत्राटी  कामगार कॉलनीमधील रहिवाशांच्या घरातून कचरा घेऊन येणे,  कॉलनीतील कचरा झाडून जमा करणे, कचरा पालिकेच्या कचरा गाडीपर्यंत पोहोचविणे आदी  प्रकार कामे करतात. कंत्राटदाराने  काम करत असलेल्या कामगारांना एप्रिल, मे व जून या महिन्यांचा पगार दिलेला नाही. तरी कामगार विनावेतन ३० जूनपर्यंत काम करत होते. परंतु  तीन महिन्यांचे कंत्राटदाराने वेतन न  दिल्यामुळे १ जुलैपासून कामगारांनी साफसफाईचे काम बंद केले आहे. 

तीन महिन्यांचे वेतन देण्याची मागणी-

कामगारांनी  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनकडे तक्रार केल्यानंतर युनियनने तातडीने या कंत्राटी कामगारांची दखल घेऊन अध्यक्ष राजीव जलोटा यांना पत्र दिले. त्याचप्रमाणे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्याशी युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, उपाध्यक्ष शीला भगत व प्रदीप नलावडे यांनी बोलणी करून सफाई कामगारांना तीन महिन्यांचे वेतन द्यावे, अशी मागणी केली आहे. 

मुंबई पोर्ट प्रशासनाने या विषयात लक्ष घालून, कंत्राटदाराला  तीन महिन्यांचे पगार तात्काळ देण्यास सांगावे, अशी मागणी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी मुंबई  पोर्ट  प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :मुंबईपाऊसकचरा प्रश्न