मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्न करा, भूषण गगराणी : निवडणुकीच्या तयारीचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 09:44 AM2024-09-14T09:44:38+5:302024-09-14T09:46:20+5:30
निवडणुकीच्या कामकाजात कसूर राहू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना त्यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रत्येक नागरिकांपर्यंत आपली यंत्रणा पोहोचेल, यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश पालिका आयुक्त तसेच निवडणूक जिल्हाधिकारी भूषण गगराणी यांनी शुक्रवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले.
निवडणुकीच्या कामकाजात कसूर राहू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना त्यांनी केली.
मुंबईतील मतदान केंद्रांची स्थिती, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदार यादी, स्ट्राँग रूम, संवेदनशील मतदान केंद्र, पोलिस व निवडणूक यंत्रणेची विविध मतदारसंघांत संयुक्त पाहणी तसेच मतदानाबाबत जनजागृती याचा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (उपनगरे) राजेंद्र क्षीरसागर आणि विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांनी आढावा सादर केला.
अडचणींवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करा-
१) विधानसभा निवडणुकीशी संबंधित मुंबईतील सर्वच यंत्रणांकडून उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. मतदार यादीत मतदार नोंदणी आदी प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करावी.
२) नागरिकांना त्यांच्या निवासाच्या ठिकाणापासून अगदी जवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी सुलभ रचनेवर भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने देखील गृहनिर्माण संस्थांशी पुन्हा भेटी देऊन समन्वय साधावा.
३) संपूर्ण कामकाजादरम्यान कोणत्याही अडचणींबाबत वेळीच आणि योग्य पद्धतीने तोडगा निघावा, यासाठी वरिष्ठांशी वेळोवेळी चर्चा करावी, अशा सूचना गगराणी यांनी संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना दिल्या.