पदवीपेक्षा पदविकेला प्राधान्य! पॉलिटेक्निकच्या प्रवेशाकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा अधिक कल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 11:37 AM2024-07-22T11:37:04+5:302024-07-22T11:40:32+5:30
तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या ३९० संस्थांमध्ये पॉलिटेक्निकच्या एक लाख पाच हजार जागा आहेत.
मुंबई : इयत्ता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (पॉलिटेक्निकच्या) प्रवेश प्रक्रियेची तात्पुरती गुणवत्ता यादी २० जुलैला तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केली आहे, तर अंतिम गुणवत्ता यादी २५ जुलैला जाहीर होणार आहे. तात्पुरत्या गुणवत्ता यादीत दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या १४ विद्यार्थ्यांसोबत ९१ ते ९९ टक्के गुण मिळवलेले १० हजार २९६ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या ३९० संस्थांमध्ये पॉलिटेक्निकच्या एक लाख पाच हजार जागा आहेत. या जागांसाठी एक लाख ५५ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. त्यापैकी एक लाख २७ हजार ९७२ विद्यार्थ्यांचे अर्ज सुविधा केंद्रांद्वारे निश्चित करण्यात आले होते.
४८ हजार विद्यार्थी रांगेत-
त्यात ८४ हजार ४६३ विद्यार्थी व ४३ हजार ५०९ विद्यार्थिनी आहेत, तर या यादीत दहावीत १०० ते ८१ टक्के गुण मिळालेले ४८ हजार २४२ विद्यार्थी प्रवेशासाठी रांगेत असल्याचेही दिसून आले आहे.
या संकेतस्थळाला द्या भेट-
प्रसिद्ध केलेल्या यादीतील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता, आरक्षण आदींबाबत दुरुस्ती करावयाची असल्यास २१ ते २३ जुलैदरम्यान सुविधा केंद्राद्वारे कागदपत्रे पडताळणीनंतर बदल करता येईल. पहिल्या केंद्रिभूत प्रवेश फेरीसाठी पसंतीक्रम (विकल्प अर्ज) २६ ते २९ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरता येणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार झालेले पहिल्या फेरीचे जागावाटप संचालनालयाकडून ३१ जुलैला प्रसिद्ध केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी केंद्रिभूत प्रवेश फेरीसाठी विकल्प अर्ज भरण्यासाठी, तसेच महत्त्वाच्या सूचना व विकल्प अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.