लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई : मुंबईतील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आयटीआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत आतापर्यंत ५,०६३ विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासक्रमाच्या विविध शाखांना प्रवेश घेतला आहे. त्यामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमासाठी ५५८ प्रवेश निश्चित झाले आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय अभ्यासक्रम चालविला जातो. दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतात.
दहावीनंतर विद्यार्थ्यांना रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रशिक्षण देण्यात आयटीआयचे मोठे योगदान आहे. दरवर्षी राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य होते. प्राप्त तसेच, उद्योग-व्यवसायांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. राज्यात ४१८ शासकीय आयटीआय आहेत. त्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत आयटीआयच्या ५१ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
दुसरी फेरी सुरू-
१) सद्यस्थितीत आयटीआय अभ्यासक्रमाच्या संस्थात्मक स्तरावरील प्रवेशाची दुसरी फेरी सुरू आहे.
२) या फेरीत महाविद्यालयांचे वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.
त्यात पारंपरिक अशा इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, मेकॅनिकल अभ्यासक्रमांना अधिक मागणी आहे. तसेच आयओटी टेक्निशियन, सव्र्व्हेयर, फूड अँड बेव्हरेज असिस्टंट आदी नवीन अभ्यासक्रमही आले आहेत.
दरम्यान राज्यात आयटीआय अभ्यासक्रमाच्या एक लाख २२ हजार ५०६ जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यामध्ये सरकारी आयटीआयमध्ये ८७ हजार तीन विद्यार्थ्यांनी, तर खासगी महाविद्यालयांमध्ये ३५ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.