लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अकरावी प्रवेशाची सहावी विशेष फेरी नुकतीच संपली असून, या फेरीत निवड झालेल्या ३ हजार ३९ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. दरम्यान सहाव्या विशेष फेरीनंतर प्रवेशासाठी नोंदणी केलेले मात्र अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २७ हजार ४४७ आहे. तर, आतापर्यंत अकरावीसाठी २ लाख ७२ हजार ५८४ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्तित केला आहे. यानंतरही मुंबईत अद्याप प्रवेशाच्या १ लाख १ हजार १४९ जागा रिक्त आहेत.
अकरावी प्रवेशाच्या सहाव्या विशेष फेरीनंतर आता कोणतीही नियमित किंवा विशेष फेरी होणार नसल्याचे उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता दोन दिवसांत डेली मेरिट राउंडचे वेळापत्रक प्रदर्शित करून त्याप्रमाणे पुढील प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
दरवर्षी होणाऱ्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरीवर मागील वर्षात अनेक आक्षेप घेतले गेल्याने यंदा प्रवेशाची फेरी बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे प्रवेशासाठी उर्वरित २७ हजार विद्यार्थ्यांना आता डेली मेरिट राउंडमधून प्रवेश घ्यावा लागणार आहे.