मुंबई : इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार असून, या यादीत तरी पसंतीचे महाविद्यालये मिळणार का, याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली आहे.
यंदा इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी चार लाख ७२५ जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत पार पडलेल्या दोन्ही फेऱ्यांत मिळून एक लाख १३ हजार ८४९ जागांवर प्रवेश निश्चिती झाली आहे. दरम्यान अकरावी प्रवेशाच्या तब्बल दोन लाख ८६ हजार ८७६ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांमध्ये केंद्रीय प्रवेशाच्या एक लाख ७० हजार, तर कोटा प्रवेशाच्या एक लाख १६ हजार ७२८ जागा रिक्त आहेत. पसंतीच्या महाविद्यालयांकडे कल असल्यामुळे इतर महाविद्यालयांत निवड होऊनही अनेक विद्यार्थी प्रवेश निश्चिती करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीतही ७३ हजार विद्यार्थ्यांची निवड होऊनही त्यापैकी केवळ २५ हजार विद्यार्थ्यांनीच केवळ प्रवेशनिश्चिती केली.
वाणिज्य, विज्ञान शाखेला पसंती-
विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणेच वाणिज्य व त्यानंतर विज्ञान शाखेलाच पसंती दिली असल्यामुळे नामांकीत महाविद्यालयांतील या शाखांचे कट ऑफ काहीसे वाढलेले आहेत. रुईया, पोदार, केसी, वझे केळकर, सेंट झेविअर्स, मिठीबाई अशा अनेक नामांकीत महाविद्यालयांच्या कट ऑफ गुणांत घसरण न झाल्याने ८० ते ९० टक्क्यांदरम्यानच्या विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयांत प्रवेशासाठी चुरस असणार आहे.
या विद्यार्थ्यांना संधी नाही-
१) पहिल्या यादीत प्रवेश घेतलेल्या, दुसऱ्या यादीत प्रथम पसंतीचे कॉलेज नाकारणाऱ्या, तसेच घेतलेला प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीत प्रवेशाची संधी मिळणार नाही.
२) १९ जुलैला कोट्यांतर्गत प्रवेशासाठी पात्र, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी २२ ते २४ जुलैपर्यंत मुदत असणार आहे.
कट ऑफ किती खाली उतरणार -
पहिल्या यादीत बहुतांश मोठ्या महाविद्यालयांचा कट-ऑफ ९० टक्क्यांच्या वर होता. दुसऱ्या यादीतही यामध्ये फारसा फरक पडला नाही. नामांकित महाविद्यालयांचा कट ऑफ ८५ ते ९२ दरम्यान असल्याने अनेक विद्यार्थ्यांची मोठी निराशा झाली. त्यामुळे आता तिसऱ्या यादीत हा यादीत कट-ऑफ किती खाली उतरतो, याकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष असणार आहे.