Join us  

जीवघेणे धाडस कशासाठी; रील्स महत्त्वाचे की जीव? अपघातांत ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:43 AM

वाहनाला खेळणे समजून स्टंटबाजी करण्याची मानसिकता शहरातील तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे.

मुंबई : वाहनाला खेळणे समजून स्टंटबाजी करण्याची मानसिकता शहरातील तरुणाईच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे. अशी स्टंटबाजी अनेकांच्या जिवावर बेतत असल्याचा प्रत्यय अनेकदा समोर येत आहे. चित्रपटांमधून अशा स्टंटबाजीचे दर्शन नेहमीच घडत आले आहे. याच भरधाव दुचाकीच्या अपघातांमुळे ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू झाले आहेत. व्हिडीओ जास्तीत जास्त व्हायरल होण्यासाठी जीवेघेणे स्टंट करत ते रील्स बनवताना दिसत आहे. दुसरीकडे जीवघेणे रिल्स करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे अनेकांची रील्सनंतर पोलिस वारी झाली आणि त्याचे व्हिडीओही शेअर करण्यात आले.

कुठलेही पाऊल उचलताना पुढे ते पाहण्यासाठी आपण जिवंत राहू की नाही, याचा विचार करून याची काळजी घ्या. आपल्यामागे आपले कुटुंब आहे. याचेही भान असू द्या, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियाद्वारे पोलिस जनजागृती करताना दिसतात.

...अन् सुरू होतो जीवघेणा थरार

मुंबईच्या वरळी सी लिंक, विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्ग, पेडर रोड, वांद्रे रिक्लेमेशन सेंटर ही ठिकाणे सध्या रेसिंग पॉइंट झाली आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई तसेच अन्य शहरांतून आलेली तरुणाई हाजीअली अथवा नरिमन पॉइंट येथे एकत्र येतात. 

गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी रात्री साडेबारा ते पहाटेपर्यंत त्यांचा खेळ सुरू असतो. १ किमीपासून ते ७ किमीपर्यंतच्या अंतरात रेसिंग होते. नाकाबंदी, पोलिस बंदोबस्त याची माहिती ते आधीच घेऊन ठेवतात. त्यामुळे पोलिसांनी या भागात त्यांची गस्त वाढवली आहे.

प्रसिद्धीसाठी कायपण...

१) पूर्वी स्वतः ला सिद्ध करण्यासाठी साहसी खेळ खेळले जायचे. सद्यस्थितीत सोशल मीडियाच्या वाढत्या जाळ्यात फक्त प्रसिद्धीसाठी असे प्रकार होतात.

२) सध्याची तरुणाई बालपणातच सोशल मीडियालाच आपले जग समजते आहे. त्यात पुढे राहणे म्हणजे यशाचा टप्पा गाठणे, असा त्यांचा समज झाला आहे. 

३) यामुळे काही तरी वेगळे करायचे आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करायचा. लाइक्स कमी मिळाले तर आणखी धाडसी खेळ करून तो पोस्ट करण्याची धडपड असते. 

४) या जीवघेण्या विचारात आपण ते लाईक्स पाहण्यासाठी राहू का? हा विचार होणे गरजेचे आहे. यासाठी पालकांनी त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. बालपणातच चांगल्या वाईट गोष्टी पटवून द्याव्यात, असे मानसोपचारतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईअपघातसोशल मीडिया