Join us  

अचानक वीज गेली; एका क्लिकवर सेवा, महावितरणच्या ग्राहकांना ऊर्जा ‘चॅटबॉट’द्वारे मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:21 AM

वीज सेवेसंदर्भात माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा, याकरिता ‘ऊर्जा’ चॅटबॉट हा एक सुलभ डिजिटल पर्याय आहे, अशी माहिती महावितरणने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वीज सेवेसंदर्भात माहिती कुठे विचारावी आणि या सेवांचा घरबसल्या लाभ कसा घ्यावा, याकरिता ‘ऊर्जा’ चॅटबॉट हा एक सुलभ डिजिटल पर्याय आहे, अशी माहिती महावितरणने दिली. महावितरण कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून वीज ग्राहकांच्या मदतीसाठी हा चॅटबॉट आपल्या वेबसाइट व मोबाइल ॲपवर उपलब्ध करून दिला आहे. इंग्रजी व मराठीत चॅटबॉट सेवेवर संवाद साधता येतो.

महावितरणच्या विविध सेवांबाबत ग्राहकांना ‘ऊर्जा’ चॅटबॉटला प्रश्न विचारता येतात. ग्राहकसेवांबाबत थेट प्रश्न विचारून विविध सेवांचा लाभ व तक्रारी नोंदविण्यासाठी ‘ऊर्जा’ नावाचे चॅटबॉट माहिती व तंत्रज्ञान विभागाने विकसित केले आहे. घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर ‘ऊर्जा’ चॅटबॉट www.mahadiscom.in ही वेबसाइट व ॲपवर उपलब्ध आहे.

वीज सेवेबाबत माहिती हवी असल्यास ‘ऊर्जा’द्वारे संबंधित सेवेचा तपशील ऑनलाइनद्वारे उपलब्ध होणार आहे. संबंधित सेवेची थेट लिंक ग्राहकांना चॅट बॉटमधूनच उपलब्ध आहे. वीजपुरवठा खंडित होणे, वीज बिलांसह इतर तक्रारींबाबत माहिती ग्राहकांना उपलब्ध होत आहे. तक्रार करण्यासाठी महावितरणचे २४x७ सुरू असलेले टोल फ्री क्रमांक, एसएमएस क्रमांक, ई-मेल, मिस्ड कॉल सेवांची माहिती उपलब्ध आहे.

ग्राहकांना थेट मदत-

नवीन वीजजोडणी, वीजबिल भरणा, जलद वीजबिल भरणा, मोबाइल क्रमांक व ई-मेलची नोंदणी इतर विविध शुल्कांचा ऑनलाइन भरणा, स्वतः मीटर रीडिंग नोंदविणे, गो-ग्रीन नोंदणी, वीजवापर व बिलाचे कॅलक्युलेटर आदींबाबत वीजग्राहकांना ‘ऊर्जा’ चॅटबॉट थेट मदत करत आहे.

तक्रारींसाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही-

वीजसेवा किंवा तक्रारी नोंदविण्याबाबत कार्यालयांमध्ये जाण्याची आता आवश्यकता नाही. मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना मोबाइल किंवा ग्राहक क्रमांक टाकून चॅटबॉटद्वारे महावितरणशी संवाद साधता येतो.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना सुलभपणे सेवा देण्यासाठी ‘ऊर्जा’ चॅटबॉट ही डिजिटल संवाद सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वीज सेवाविषयक माहिती, तक्रारी व अडचणीसाठी ग्राहकांनी महावितरणच्या या सुविधेचा वापर करावा.- भारत पवार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण

टॅग्स :मुंबईवीजमहावितरण