मुंबई : भटकी कुत्री किंवा अन्य मोकाट प्राण्यांमुळे त्रस्त आहात? मग घ्या मोबाइल आणि महापालिकेच्या मायबीएमसी मोबाइल ॲप्लिकेशनवर तक्रार करा.
मुंबईत भटक्या श्वानांकडून होणाऱ्या उपद्रवाच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भटके श्वान किंवा पाळीव प्राण्यांचे लसीकरण, निर्बीजीकरण यांसह प्राण्यासंदर्भातील तक्रारी नोंदवण्याची सुविधा या ॲपवर आहे. तसेच प्राण्यांसाठी काम करणारे विविध शासकीय विभाग किंवा संस्था यांचीही माहिती ॲपवर उपलब्ध होऊ शकणार आहे. महापालिकेच्या मायबीएमसी हे मोबाइल ॲप्लिकेशन किंवा अधिकृत संकेतस्थळावरही ही सोय आहे.
मृत प्राण्यांवर अंत्यसंस्काराची सोय-
याशिवाय, छोट्या मृत पाळीव प्राण्यांच्या दहनासाठीही ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधाही या ॲपवर देण्यात आली आहे. मालाड येथील स्मशानभूमीमध्ये सुमारे ५० किलोपेक्षा कमी वजनाच्या मृत प्राण्यांचे दहन करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येईल.
इथे करू शकता तक्रार-
भटक्या किंवा पाळीव श्वानांचे लसीकरण, निर्बीजीकरण किंवा त्या अनुषंगाने काही तक्रारी असतील किंवा काही मदत हवी असेल तर नागरिकांना मायबीएमसी मोबाइल ॲप्लिकेशनचा वापर करता येईल.
पालिकेच्या विविध योजना, सुविधांची माहिती, प्राण्यांसाठी कार्यरत विविध शासकीय विभाग किंवा संस्था आदी माहिती या ॲपवर मिळेल. - डॉ. कलीमपाशा पठाण, महाव्यवस्थापक, पशुवैद्यकीय आरोग्य विभाग
कार्यवाहीचा आढावा समजणार-
१) महापालिकेच्या ॲपचा वापर करताना त्यावर सर्वांत आधी तक्रार किंवा विनंती यापैकी एकाची निवड करून तुमची माहिती नोंदवावी लागेल.
२) त्यानंतर संबंधित विनंती किंवा तक्रारीसाठी एक विशिष्ट क्रमांक तयार होईल व तो नागरिकाच्या थेट मोबाइलवर येईल.
३) या क्रमांकाच्या आधारे नागरिक तक्रार किंवा विनंतीवरील कार्यवाहीबाबतच्या स्थितीचा वेळावेळी आढावा घेऊ शकतील.