लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : युगांडातील व्यापाऱ्याला ८१० टन साखरेपैकी ३४९ टन वैधता संपलेल्या साखरेचा पुरवठा करत तीन लाख ५५ हजार अमेरिकन डॉलरची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात अशोका शॉपिंग सेंटरमधील अल नूर इम्पेक्सचे मालक मोहमंद इक्बाल अब्दुल गफ्फार बटाटावाला आणि अहमद मोहम्मद इक्बाल नूर बटाटावालाविरुद्ध मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे पंजाबचे रहिवासी असलेले व्यापारी पंकज सुभाषचंद्र गोयल (वय ४४) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गोयल हे युगांडातील कम्पला सिटीमध्ये राहतात. १ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांनी बटाटावालाकडून ८१० टन साखर मागवली. त्याचे तीन लाख ५५ हजार अमेरिकन डॉलरही बटाटवाला याला पाठवले.
कॉपीराईटचा गुन्हा दाखल-
अहमद विरुद्ध यापूर्वी कॉपीराईटचा गुन्हा नोंद आहे. ब्रँडेड सौंदर्य प्रसाधनांच्या नावाखाली बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
बँक स्टेटमेंट, बिलेही बनावट-
१) पिता-पुत्राने पहिल्या खेपमध्ये एक लाख ७६ हजार डॉलरची ३४९ टन साखरेची शिपमेंट पाठवली.
२) फेब्रुवारी २०२३ मध्ये साखर युगांडामध्ये पोहोचताच तेथील फूड ऑफिसरने तिची वैधता संपल्याने ती जप्त केली.
३) गोयल यांनी मार्च २०२३ मध्ये मुंबई गाठून याबाबत बटाटावालाकडे चौकशी करत पैसे परत देण्याचा तगादा लावला. बटाटावालाने साखर पुरवठादारांना पैसे आधीच दिले असल्याचे बिल दाखवून लवकरच दुसऱ्या खेपेत साखर पाठवणार असल्याचे आश्वासन दिले. अनेकदा पाठपुरावा करूनदेखील हाती काहीच लागत नसल्याने गोयल यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
४) १ सप्टेंबर २०२२ ते २४ जून २०२४ दरम्यान ही फसवणूक झाली आहे. बटाटावालाने दाखवलेले बँक स्टेटमेंट आणि बिलदेखील बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
५) फसवणुकीच्या उद्देशाने दोघांनी बनावट बिलांच्या आधारे वैधता संपलेल्या साखरेचा पुरवठा केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.