जेलीफिशपासून संरक्षणाबाबत उपाययोजना करा; मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या मनपाला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 11:41 AM2024-08-07T11:41:01+5:302024-08-07T11:44:37+5:30

मुंबई किनारपट्टीवर जेलीफिश आढळत आहेत.

in mumbai take measures to protect against jellyfish notice from municipal commissioner of fisheries | जेलीफिशपासून संरक्षणाबाबत उपाययोजना करा; मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या मनपाला सूचना

जेलीफिशपासून संरक्षणाबाबत उपाययोजना करा; मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या मनपाला सूचना

मुंबई : मुंबई किनारपट्टीवर जेलीफिश आढळत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी जेलीफिशपासून आपले संरक्षण कसे करावे, याबाबत पालिका प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी दिल्या आहेत. याबाबत ५ ऑगस्ट रोजी 'लोकमत'ने 'सावधान ! मुंबईच्या किनारी जेलीफिश दाखल' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी उपाययोजनांबाबत पालिकेला सूचना केल्या आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये मुंबई किनारपट्टीवर 'ब्लू बटन जेलीफिश', 'स्टिंग रे' प्रजातीचा वावर अधिक दिसून येतो. स्टिंग रेचा दंश झाल्यास नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. त्यामुळे पर्यटकांनीही स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे.

'पर्यटकांना मज्जाव करावा'-

जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करतानाच सुरक्षिततेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कराव्यात, अशा सूचना राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी दिल्या.

जनजागृतीसाठी फलक लावा-

पालिकेने नागरिकांच्या माहितीसाठी जनजागृती करणारा फलक जुहू व वर्सोवा चौपार्टी परिसरात लावले आहेत. मात्र, अजून गिरगाव, दादर, अक्सा, गोराई परिसरात अजून सदर फलक लावले नाहीत. आज जुहू बीचवर रुग्णवाहिका आली आणि दोन-तीन तास थांबून परत निघून गेली, अशी माहिती जीवरक्षकांनी 'लोकमत'ला दिली.

काय काळजी घ्याल?

१) जेलीफिशचा देश झाल्यास जखम चोळून चिघळली जाणार नाही याची काळजी घ्या. जखम स्वच्छ पाण्याने धुऊन काढून त्याजागी बर्फ लावा.

२) नागरिकांनी समुद्रात जाताना उघड्या अंगाने जाऊ नये. पाण्यामध्ये जाताना गमबुट' वापरावे आणि लहान मुलांना पाण्यामध्ये पाठवू नये. 

३) माशांनी दंश केल्यास घाबरून न जाता त्वरित महापालिका आरोग्य सेवेच्या केंद्रात संपर्क साधावा, अशी माहिती कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी दिली.

Web Title: in mumbai take measures to protect against jellyfish notice from municipal commissioner of fisheries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.