मुंबई : मुंबई उत्तर मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. गोयल यांनी १५ मार्चला मुंबईचा पहिला दौरा करताना बोरिवली येथे कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, गोयल यांनी रेल्वेमंत्रिपद भूषवले असून, ते आपल्या मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवणार का, लोकलची जीवघेणी गर्दी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणार का, असा प्रश्न स्थनिक मतदार विचारत आहेत.
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात दहीसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली, चारकोप, मालाड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.
१) विविध प्रकल्पांची कामे सुरू असल्यामुळे वाहतूककोंडी टाळण्यासाठी लाखो नागरिक रेल्वे वाहतुकीचा पर्याय स्वीकारतात.
२) यामुळे चर्चगेट ते बोरिवली या मार्गावरील रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, या मार्गावरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक आधीच व्यस्त असल्याने नवीन गाड्या केव्हा व कशा सुरू कराव्यात, हा मोठा प्रश्न रेल्वे प्रशासनासमोर आहे.
मतदारसंघात वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न-
मुंबई उत्तर मतदारसंघातील मतदारांना वाहतूककोंडीचा सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावत आहे. सध्या उत्तर मुंबईत गोयल यांनी प्रचाराला जोरात सुरुवात केली असून त्यांच्याविरुद्ध सध्या उमेदवारच नसल्याने गोयल यांच्याकडून प्रवाशांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
त्यातच पीयूष गोयल हे माजी रेल्वेमंत्री असल्याने मुंबईकरांच्या लोकल कळा ते अधिक व्यवस्थितपणे समजून घेतील, अशी आशा मतदारांतून व्यक्त होत आहे. याचा अभ्यास करून ते भविष्यात त्यावर उपाय शोधतील, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या समस्या काय ?
कांदिवली, मालाड स्थानक परिसरात राहणाऱ्यांना विरारच काय, पण बोरिवली गाडीत कोणत्याही वेळी चढणे उतरणे मुश्कील होते. शिवाय विरारहून येणाऱ्या गाड्यांमध्ये चढणे बोरिवलीवासीयांना अशक्य असते. विरार गाड्यांमध्ये कांदिवली, बोरिवलीकरांना उतरणे मुश्कील होते. बोरिवलीहून सुटणाऱ्या गाड्या अंधेरीपर्यंत आणि पुढे पुन्हा मुंबई सेंट्रलपासून चर्चगेटपर्यंत धिम्या गतीने धावत असल्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो. या कारणास्तव थेट बोरिवली गाड्यांची मागणी प्रवाशांकडून वाढत आहे.