Join us  

शिक्षकहो, नोकरी टिकवण्यासाठी परीक्षा द्या! मंत्र्यांची घोषणा, मात्र शिक्षण सेवकांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 10:23 AM

शिक्षण सेवकांची तीन वर्षांची सेवा झाल्यानंतर परीक्षा घेऊन त्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. तसा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिक्षण सेवकांची तीन वर्षांची सेवा झाल्यानंतर परीक्षा घेऊन त्यांना सेवेत कायम करण्यात येणार आहे. तसा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र, या परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास त्यांना आपली नोकरी गमावण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे त्याला शिक्षण सेवकांचा तीव्र विरोध आहे. 

शासनाच्या बदलत्या निकषांमुळे शिक्षण सेवकांना आता पुन्हा परीक्षेला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात १४ हजार उमेदवारांना शिक्षण सेवक म्हणून तीन वर्षांसाठी नेमणूक करण्यात आली आहे. आणखी पाच हजार उमेदवार आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने नियुक्तकेलेल्यांना मात्र प्रत्येक टप्प्यावर नवनवीन परीक्षांना सामोरे जावे लागत असल्यामुळे त्यांच्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

तीन वर्षे झाली, द्या परीक्षा-

सध्या पवित्र पाटलद्वार राज्यात शिक्षक भरती पार पडली आहे. यात हजारो उमेदवारांची शिक्षण सेवक म्हणून तीन वर्षांसाठी नेमणूक केली आहे. त्यांना तीन वर्षांनंतर पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना कायमस्वरूपी नेमण्यात येणार आहे. राज्यात शेकडो शिक्षण सेवक कार्यरत आहेत. राज्य शासन या शिक्षण सेवकांना १५ हजार रुपयांचे मानधन देत आहे. इतक्या अल्प मानधनावर काम करणे आणि वारंवार स्वतःची पात्रता सिद्ध करणे, यामुळे राज्यातील शिक्षण सेवक आता खूप त्रस्त झाले आहेत.

महाराष्ट्र शिक्षक परिषद घेणार परीक्षा ज्या शिक्षण सेवकांनी तीन वर्षे नोकरीचा कालावधी पूर्ण केला आहे, त्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. महाराष्ट्र शिक्षक परिषद शिक्षक पात्रता परीक्षा घेणार आहे.

शिक्षण सेवक म्हणतात.... 

राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे. डीएड, बीएड करताना परीक्षा, त्यानंतर पुन्हा टीईटी पास एवढे सोपस्कार केल्यावर शिक्षण सेवक म्हणजे शासनाचा आपल्याच अभ्यासक्रमावर विश्वास नाही, असा सूर शिक्षण सेवकांमध्ये आहे.

टॅग्स :मुंबईशिक्षकनोकरीशिक्षण क्षेत्र