Join us

‘टीम इंडिया’च्या चाहत्यांचा मुंबईत रस्तोरस्ती जल्लोष; डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव 

By सीमा महांगडे | Published: July 05, 2024 9:48 AM

टी-२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळाबाहेर चाहत्यांनी दुपारपासून गर्दी केली होती.

सीमा महांगडे, मुंबई : टी-२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळाबाहेर चाहत्यांनी दुपारपासून गर्दी केली होती. टीम इंडियाचे विमानतळाबाहेर आगमन होताच चाहत्यांनी इंडिया, इंडिया, भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उत्साही चाहत्यांनी ढोल-ताशे वाजवत आणि गाणी लावत रोहित शर्मा आणि टीमचे स्वागत केले. विमानतळापासून हॉटेलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांनी टीम इंडियाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. बहुतेक जणांनी टीम इंडियासारखी निळी जर्सी परिधान केली होती. हेच दृश्य कमीअधिक प्रमाणात वानखेडे स्टेडियमवरही होते.

टीम इंडिया आणि त्यांच्या हातातील विजयाची ट्रॉफी पाहण्यासाठी चाहत्यांनी दुपारपासून रांगा लावल्या आणि वाट बघितली. त्यांच्या यासाठीच्या भावना शब्दात व्यक्त न होता फक्त जल्लोषातच व्यक्त होऊ शकतात, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या. चर्चगेट स्थानकावर आरपीएफ पोलिसांना लोकांना पुन्हा जाण्याचे आवाहन करावे लागले. वानखेडे आणि परिसरात प्रचंड गर्दी झाली असून लोकांनी तिथे जाऊ नये अशी विनंती आरपीएफ पोलिस हातात माईक घेऊन करत होते.

आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे की, भारत विश्वविजेता बनला आहे आणि आज आम्ही त्यांच्यासोबत हा आनंद शेअर करणार आहोत. वेळ काढून आम्ही या ठिकाणी सर्व मित्रांसोबत आलो आहोत. आमच्याबरोबर सर्व भारतीयांचा उत्साह आणि जल्लोष संपूर्ण जगाला दिसला पाहिजे.- दीपेंद्र सिंग

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी नंतर रोहित शर्मा याचं नाव वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारांच्या यादीत सामील झाले आहे याचा आम्हाला मुंबईकर म्हणून खूप अभिमान आहे. रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे आणि आमच्या मुंबईचा राजा आहे आणि आमच्या मुंबईच्या राजाने विश्वविजेतेची ट्रॉफी १७ वर्षांनंतर उचलली आहे.- वेदांत शिर्के

काही मार्ग बंद केल्यामुळे आमच्यासारख्या काही नोकरदारांना उशीर होत आहे. मात्र आम्हालाही माहीत आहे की, आज मोठा क्षण आहे आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने सगळे रस्त्यावर उतरले आहेत. मात्र याचे नियोजन आवश्यक होते. बस, टॅक्सी पुढे जातच नसल्याने आता स्थानकापर्यंत पोहचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास चालत जावे लागले.- अन्वयी पंडित

हा आनंद अनुभवण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आणि खरंच आमच्या पिढीला या टीमने खूप मोठी भेट दिलेली आहे. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली, जडेजा यांनी घेतलेली निवृत्ती मनाला काही रुचलेली नाही. तरीही त्यांनी नवीन खेळाडूंचा विचार यात केला असल्याचे दिसत आहे. सध्या तरी हे सगळं विसरून आम्ही फक्त इथे आपला विश्वविजय साजरा करण्यासाठी आलेलो आहोत.- विशाल वानखडे

असे ऐतिहासिक क्षण खूप कमी अनुभवण्यासाठी वाट्याला येतात म्हणून आज इथे आलो आहे. २०२४ च्या टी २० विश्व चषक जिंकून भारतीय संघाने आज संधी आम्हाला दिलेली आहे. त्याबद्दल संपूर्ण भारतीय संघाचे आम्ही आभारी आहोत. भारत माता की जय, वंदे मातरम.- कृष्णा सावंत

इतकी वर्षे विश्वचषकाने भारताला हुलकावणी दिली. त्यामुळे हा विजय खास आहे. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलो आहोत. सगळेजण एन्जॉय करतात. पाऊस पडतोय तरी पण आम्ही सगळेजण मजा करत आहोत, आमचा जल्लोष कमी झालेला नाही. भावी पिढ्यांना आम्ही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होतो हे नक्की सांगू.- रोहन चव्हाण

आमचा सात जणांचा ग्रुप बंगळुरूवरून विराट कोहलीसाठी आलेला आहे. आम्ही आपला कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघाचे खूप आभार मानतो की, आपण आमच्या विराट कोहलीच्या हाती पुन्हा विश्वचषकाची ट्रॉफी दिलीत. विराट कोहली आयपीएलची ट्रॉफीही अशीच उंचावेल हीच आम्हाला अपेक्षा आहे.- एस. बालकृष्णन

टी-२० विश्वचषक विजेता भारतीय संघ, २००७ नंतर हा सोहळा प्रत्यक्षात अनुभवायला मिळतोय हा खूप भारी अनुभव आहे. डहाणू ते चर्चगेट लोकल प्रवासादरम्यान चाहत्यांनी केलेला जल्लोष हा अवर्णनीय होता. तिथेच आम्हाला जाणीव झाली की, जेव्हा सूर्या दादाने तो अप्रतिम झेल घेतला, तेव्हा चाहत्यांनी किती कल्ला केला असेल. खरंतर हे पर्व संपूच नये असं वाटतंय. रोहित शर्माचा एक चाहता म्हणून हा सोहळा अनुभवणे खूपच आनंददायी होते. भारताने असंच विजयी राहणे, गॉड इज ग्रेट... मला कसंही करून भारतीय संघाच्या या विजयी यात्रेचा अनुभव घ्यायचा होता आणि तो घेतलाच.- हार्दिक धानमेहेर, डहाणू

विश्वचषकाची ट्रॉफी आपल्या खेळाडूंच्या हातात पाहून आनंद झाला. जणू काही ती ट्रॉफी आपल्याच हातात असल्यासारखी वाटली. आतापर्यंत हा क्रिकेटचा विजयी थरार टीव्हीवर, मोबाइलवर अनुभवला होता. आज इथे येऊन प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हा अनुभवण्याची मजा काही वेगळीच आहे. आम्ही हा क्षण चुकवू इच्छित नसल्याने ठाण्याहून इथे आलो आहोत. - रिषिका मौर्या

बाहेरच्या देशांमध्ये फुटबॉल प्रेमी त्यांच्या खेळाडूंसाठी रस्त्यावर गर्दी करतात. भारतातही तेवढेच प्रेम क्रिकेटवर आहे आणि आज तशीच संधी आमच्या भारतीय संघाने आम्हाला दिली. या संधीचे सोने करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. त्याबद्दल संपूर्ण भारतीय संघाचे खरच आभार. भारत माता की जय..!- संजय जोशी

टॅग्स :मुंबईट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघआयसीसी