‘रमाबाई आंबेडकरनगर’साठी तीन कंपन्यांच्या निविदा; पुनर्विकासासाठी कंत्राटदार नेमणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 10:52 AM2024-06-20T10:52:49+5:302024-06-20T10:54:29+5:30
घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर पुनर्विकास प्रकल्पासाठी वास्तुविशारद नेमण्याची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे.
मुंबई : घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगर पुनर्विकास प्रकल्पासाठी वास्तुविशारद नेमण्याची प्रक्रिया मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. यासाठी मागविलेल्या निविदांना तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून, त्यामध्ये हितेन सेठी ॲण्ड असोसिएट्स, संदीप शिकरे ॲण्ड असोसिएट्स आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर यांचा समावेश आहे.
‘एमएमआरडीए’कडून लवकरच यातून एक सल्लागार अंतिम केला जाणार आहे. तर, येत्या दोन ते अडीच महिन्यांत पुनर्विकासासाठी कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा मागविण्याचे नियोजन ‘एमएमआरडीए’ने केले आहे.
३३.१५ हेक्टर जागेचा विकास-
१) ‘एमएमआरडीए’कडून रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेचा विकास करून तेथील अंदाजे १६ हजार ५७५ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२) ‘एमएमआरडीए’ आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्या माध्यमातून हे पुनर्वसन केले जाणार आहे.
३) ‘एसआरए’कडून या भागातील बाधित झोपड्यांचे सर्वेक्षण, रहिवाशांची पात्रतानिश्चिती, जागा मोकळी करून देणे आणि पात्र रहिवाशांना घराचा ताबा देण्याचे काम केले जाणार आहे, तर ‘एमएमआरडीए’वर पुनर्विकास केल्या जाणाऱ्या इमारतींच्या बांधकामाची जबाबदारी असणार आहे.
कंत्राटदार नेमणार-
१) जागेचा ताबा मिळताच ‘एमएमआरडीए’कडून पुनर्विकास केल्या जाणाऱ्या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.
२) ‘एमएमआरडीए’ने त्यादृष्टीने नियोजन केले असून, आता लवकर प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास सुरुवात केली जाणार आहे. सल्लागारांकडून प्रकल्पाचा आराखडा अंतिम करण्याबरोबर कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा तयार केल्या जाणार आहेत.
प्रकल्पासाठी निधीचा मार्ग मोकळा-
रमाबाई आंबेडकरनगरचा पुनर्विकास ‘एमएमआरडीए’ स्वतः करणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी एमएमआरडीए जवळपास ४ हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे.
त्याला दोन बँकांनी संमती दर्शविली आहे, अशी माहिती ‘एमएमआरडीए’तील सूत्रांनी दिली.
रहिवाशांची प्रारूप यादी महिनाअखेरीस-
‘एसआरए’ने या भागातील झोपड्यांच्या सर्वेक्षण १५ मार्चपासून सुरू केले होते. आता ते काम पूर्ण झाले असून, सर्व रहिवाशांची प्रारूप यादी या महिनाअखेरपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १५ जुलैपर्यंत सर्व रहिवाशांची पात्रतानिश्चिती पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती ‘एसआरए’च्या अधिकाऱ्यांनी दिली. पात्रतानिश्चिती होताच या रहिवाशांबरोबर करार करून घरे रिकामी केली जाणार आहेत. येत्या सप्टेंबरपर्यंत ही जागा ‘एमएमआरडीए’च्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.